स्मितानुभव #63 वेलींगडला

बँकेची नोकरी म्हणजे बदली हे जुनेच समीकरण ! 1996 साली माझ्या यजमानांची बदली आंध्रप्रदेशातील 'वेलीगंडला' ह्या खेडेगावी झाली होती. मुले लहान असल्याने फक्त यजमानच तिकडे गेले होते. हे इतके लहान गाव होते की राहण्यासारखे एकही घर नव्हते. त्यामुळे कनिगिरी ह्या जवळच्या तालुका सदृष्य गावी भाड्याने घर घेतले होते.

दिवाळीच्या सुट्टीत आम्ही तिकडे गेलो होतो. पुण्याहून रेल्वेने हैद्राबाद आणि तिथून बसने कनिगिरी ह्यागावी पोहचलो. यजमान एकटेच रहात असल्याकारणाने विशेष काहीच सामान नव्हते. त्यामुळे पहिला दिवस सामान आणणे आणि घर लावणे ह्यातच गेला. त्यामुळे गाव काय आहे आणि आम्ही कुठे आहोत हे काहीच कळले नाही. दुसरे दिवशी लवकरच यजमान बँकेत निघून गेले. 

घर पहिल्या मजल्यावर होते आणि पुढे मोठ्ठी बाल्कनी होती, त्यामुळे रस्त्यावर बघण्यात वेळ गेला. वाहनांचा आवाज नाही, काहीही गडबड गोंधळ नाही …. एकदम सगळे शांत शांत होते. मधेच कोणी विक्रेता तेलगूत काहीतरी ओरडत यायचा. वस्तू दिसली तर काय विकतो आहे ते समजायचे नाहीतर नुसता आवाजच.  सपोटा म्हणजे चिक्कू एव्हढेच पहिले दिवशी समजले.

शेजारी एक कुटुंब होते, पण भाषेची अडचण होती. फक्त हास्याची देवघेव झाली.

हे इतके लहान गाव होते की गावांत टेलिफोन सुद्धा नव्हता. इकडे यायच्या आधी ही काहीच कल्पना नव्हती. पहिल्यांदा त्या गावी पोहचल्याचा फोन करण्यासाठी यजमानांना 80 किलोमीटर दूर जावे लागले होते.

पहिला दिवस चांगला पार पडला. संध्याकाळ झाली तशी आम्ही यजमानांची वाट पाहू लागलो. हळूहळू अंधार होऊ लागला. शेजारच्या ताई येऊन तेलगू मधून काहीतरी सांगत होत्या. मी आपली हसून मान डोलवत होते. रस्त्यावर दिवे नव्हतेच. सगळीकडे अंधार गुडुप.अधून मधून घुंगरच्या सायकल रिक्षाचा आवाज, बाकी शांतता! मुले पण कावरी बावरी झाली. म्हणू लागली की आई चल आपण बाबांना बघून येऊ. आम्ही कुठे आहोत ह्याचाच आम्हाला पत्ता नव्हता तर बघायला कुठे जाणार? बारीक तोंड करून बसून राहिलो. शेवटी साडे नऊ वाजता यजमान घरी आले आणि हुश्य झाले.

झाले होते असे की वेलींगडला ला जायला एकच बस होती. तीच बस जाऊन येऊन फेऱ्या करायची. रस्त्यात अपघात झाल्यामुळे बस अडकून पडली आणि त्यामुळे उशीर झाला. शेजारच्या ताई येऊन हेच सांगत होत्या आणि काळजी करू नको असे म्हणत होत्या. मनात आले जगाच्या पाठीवर मानवी भावभावना सारख्याच!

हळूहळू गावाची सवय झाली. मी मराठी-तेलगू पुस्तक घेऊन गेले होते. ते बघून हळूहळू संवाद सुरू झाला.

गावात फिरत असताना लक्षात आले की कुठेही तेलगू व्यतिरिक्त इतर लिपीत काहीही लिहिलेले नव्हते. मुलांनी बाबांना विचारले की तुम्हाला कसे कळले कि इथेच उतरायचे आहे म्हणून. बसस्टँडवर सुद्धा देवनागरीत किंवा रोमन मध्ये गावाचे नाव लिहिलेले नव्हते. प्रत्येक गावात किमान एकतरी सिनेमा थिएटर असतेच. महाराष्ट्रातून आलोय असे सांगितले की लगेच विचारायचे की शिर्डीला जाऊन आलात का? आंध्रप्रदेशात  श्री साईबाबांचे खूप भक्त आहेत. प्रत्येक गावातून शिर्डीला जाण्यासाठी बस आहे.

एक दिवस बँकेत गेलो. ही “HARDSHIP BRANCH” म्हणून वर्गीकरण केलेली शाखा आहे. असे का ? ते तिथे जात असतानाच कळले. हा प्रदेश नक्षलवादी आहे. तसा सामान्य लोकांना त्याचा काही त्रास नसतो, पण बस सर्व्हिसवर त्याचा परिणाम व्हायचा. वेलीगंडलाला जाणारी बस एका reservoir मधून जायची. ह्या भागातील पाण्यात फ्लोरिन खूप प्रमाणात आहे. त्यामुळे हातपाय संपूर्णतः वाकडे असलेली खूप माणसं गावात आहेत. पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागायचे. अतिशय उष्ण प्रदेश आहे हा. शिवाय पॉवर कट ! वीज रात्रीसाठी हवी म्हणून दिवसा नो करंट. ह्या भागात एक तऱ्हेचा अगदी छोटासा पण भयंकर विषारी साप आढळतो. ह्या शिवाय बँकेतील कामाचे टेन्शन वेगळेच! हे सगळे बघून आणि ऐकून माझी पाचावरच धारण बसली. मी मिस्टरांना सांगितले की तुम्ही एक रबर स्टॅम्प बनवून घ्या ,
“ मी सुखरूप आहे ” आणि तारीख घालून रोज एक पोस्टकार्ड मला पाठवा. इतकी भयंकर परिस्थिती होती.
आणखी एका संकटाचा मिस्टरांना सामना करावा लागला होता. अर्थात हे मला पुन्हा बदली झाल्यावर त्यांनी सांगितले. खूप उष्णता असल्याने बूट घालणे शक्यच नव्हते. किंबहुना चप्पलसुद्धा काढून बसावे लागत असे. एक दिवस वीज पडून दारातून आत आली आणि लोखंडी पायाच्या ऑफिस टेबलवर मिस्टर चप्पल काढून बसलेले असल्याने त्यांना जोरात धक्का बसला. ते जोराने मागे गेले आणि बराचवेळ पायाची संवेदना गेली होती. दारात एक कुत्रा बसला होता, त्याला पण झटका बसला होता. त्यामुळे मिस्टरांवरचा धोका कमी झाला होता.

मिस्टरांनी खूपच हाल सोसले. अडीच वर्ष ह्या शाखेत काम केले. ईश्वरकृपेने सर्व सुरळीत पार पडले …. आणि अनुभवात  भर.

#smitanubhav 63

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस