स्मितानुभव #62 फ्रेंडशिप डे
आज जागतिक फ्रेंडशिप डे....
मैत्री दिनाची सुरवात झाली 1958 मध्ये...ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार...
कशाचेही बंधन नाही पण अतूट बंध म्हणजे मैत्री.
मैत्रीत ना अडसर असतो वयाचा, काळाचा, लिंगाचा ना अंतराचा.....बस्स असते ते प्रेम, आत्मीयता आणि सद्भावना! आपल्याकडे तर मैत्रीची प्राचीन परंपरा आहे.
सखी-पार्वती, कृष्ण-सुदामा, कर्ण-दुर्योधन, कृष्ण- अर्जुन!
मध्यन्तरी एक मैत्रीण मला पोहे देत होती, मी हो नाही म्हणायच्या आधी ती म्हणाली " पोह्याला कधी नाही म्हणू नाही. मैत्रीचे प्रतिक आहे ना ते!
सुदाम्याने दिले होते श्रीकृष्णाला! "
भारतीय परंपराच अशी आहे की कुठलंही नातं हे एकदिवस साजरं करण्यासारखं नाहीच मुळी.... तो असतो उत्सव...त्याला ना ठराविक दिवसाची गरज ना इतर कशाची. एका कटींग चहा बरोबर सुद्धा मैत्री साजरी होते आणि 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा.
कधी कधी वर्षानुवर्षे भेट होत नाही, पण आपली अशी एक मैत्रीण/ मित्र आहे ही भावना सुद्धा सुखावह असते.
माझ्याआजोबांचे ( आईचे वडील ) 1966 साली निधन झाले. त्यांचे खास मित्र होते श्री. विष्णुपंत पुराणिक. ह्या आजोबांनी मैत्री जपली ती अगदी शेवट पर्यंत. 2004 मध्ये माझ्या भावाच्या लग्नाला ते आले होते. आपल्या मित्राच्या लेकीला वडिलांची उणीव कमी भासावी ह्या उद्देशाने ते आमच्याकडील सर्व कार्यक्रमांना उपस्थित असत.
माझ्या वडिलांचे मित्रही असेच, जीवाला जीव देणारे. लोणावळ्याला त्यांचे मित्र राहतात श्री. सुरेश काचरे. ते तिथे होते म्हणून मला दादांनी नोकरीत रुजू होण्याची परवानगी दिली. काका काकू आणि अंजु, समीरने पण इतका जीव लावला की माझे दुसरे कुटुंबच. मी त्यांना लोणावळ्याचे आई बाबा म्हणते. अंजु आणि समीर मला ताई म्हणतात आणि मानतात.
पूर्वीच्याकाळी संपर्काची साधने उपलब्ध असल्याने स्त्रियांची मैत्री क्वचितच पुढे चालू राहायची. पण... अग ती आता गायिका झाली आहे ना? ती आणि मी एकाच वर्गात होतो... असं सांगताना आईचा उजळलेला चेहरा आजही डोळ्यासमोर दिसतो. बायकांची आणखी एक खासियत. लहानपणीच्या मित्रमैत्रिणी दुरावल्या म्हणून त्या खंत नाही करत, तर नवऱ्याच्या मित्राच्या बायकोशी मैत्री करून स्वतःची आस पुरी करतात आणि नवऱ्यांची मैत्रीही अबाधित ठेवतात.
ह्या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. मैत्रीचा हा वारसा माझ्यात पुरेपूर आला आहे. अगदी शाळेपासून ते आजपर्यंत ,अनंत मित्र मैत्रिणी आहेत मला. सुखात तर साथ देतातच पण संकटात पण पहाडासारखे खंबीर उभे असतात.
छोट्या मित्रमैत्रिणी निरागस आनंद देतात, तरुण मित्रमैत्रिणी नवसंजीवनी देतात, बरोबरचे मित्रमैत्रिणी नव्याने जगायला शिकवितात, तर वडीलधारी मित्रमैत्रिणी योग्य तो सल्ला देऊन जीवन सुखकर करतात.
कधी निसर्ग मित्र होतो तर कधी पुस्तक तर कधी संगीत!
मैत्रीचे नाही मोल, जीवन त्याविना फोल
हात असतो सदैव तत्पर, सावरण्या तोल
आयुष्य करी समृद्ध,आहे हा ठेवा अनमोल
मित्र हो, हृदयात खास कप्पा आहे खोल
आहात तुम्ही ही भावनाच आहे जबरदस्त
आयुष्याचे सोने झाले ठेवल्याने तुम्हावरी भिस्त
प्रत्येकाचे कर्तव्य वेगळे,आपण त्यात व्यस्त
आठवून सहवासाचे सोनेरी क्षण राहू मस्त
गाणे होई जीवनाचे,नात्यात मिसळता मैत्रीचे सूर
अपमान लज्जा भीती संकोच सहजच होई दूर
बघताना मित्रत्वाच्या दृष्टीने, बदलतो सगळा नूर
असता दृढ,रेशीम बंध मैत्रीचे,येईल आनंदाला पूर
आभार मानते फेसबुक आणि व्हाट्सअप्पचे
हरवलेले गवसले ,पुनश्च बंध जुळले मैत्रीचे
नव नवीन रोज भर ही पडे जीवन हे सुखाचे
आनंदी राहो सुखी राहो मित्रमंडळ स्मिताचे
#smitanubhav 62
Comments
Post a Comment