स्मितानुभव #60 मला भावलेले..... अमृतसर



अमृतसर म्हटले की लगेचच डोळ्यासमोर येते ते सुवर्ण मंदिर ! ते तर सुंदरच आहे. त्याचे सौंदर्य वर्णन करायला शब्दच अपुरे आहेत. माझ्या जास्त करून लक्षात राहिली ती तिथली व्यवस्था, शिस्त, आणि त्यामुळेच असलेली स्वच्छता.

आम्ही उतरलो होतो ते हॉटेल मंदिराच्या अगदी जवळ होते. मंदिराचा परिसर आणि बाकीचे अमृतसर ह्यात इतका फरक आहे कि जणू दोन वेगळे प्रदेश. मंदिराचा सगळा परिसर एकसारखा आहे. सगळ्या दुकानांची सजावट, रंगसंगती एकसारखी आहे. रस्ता व्यवस्थित बांधलेला आहे. रस्त्याच्या मधोमध दिवे आणि फुलांच्या कुंड्या आहेत. सगळे इतके सुंदर जपलेले आहे की आपण नक्की कुठे आहोत? हा प्रश्न पडतो. मंदिराबाहेर मोठे स्क्रीन लावलेले आहेत त्यावर देवळात चाललेली पूजा सतत दाखवत असतात.

मंदिराबाहेर जवळजवळ १ किलोमीटर दूर चप्पल ठेवण्याची व्यवस्था आहे. प्रचंड मोठा हॉल आहे. आत सुनियोजित रॅक आहेत. भक्तांची संख्या लाखोंच्या घरात आहे, त्यामुळे भरपूर खिडक्या आहेत. ही सोय बहुदा विनामूल्य आहे.
त्यामुळे “ देह देवळात आणि चित्त खेटरात “ असे होत नाही. तिथं पासून प्रवेशद्वारापर्यंत कार्पेट अंथरलेले आहे. आत मध्ये उघड्या डोक्याने जाऊ शकत नाही ,त्यामुळे डोक्याला बांधायचे रुमाल मोठ्या टबमध्ये ठेवलेले असतात. पुरुषांनी त्यांचे डोके झाकून घ्यायचे आणि स्त्रियांनी डोक्यावरून पदर किंवा ओढणी घ्यायची. त्यानंतर पाय धुवून मंदिराच्या आवारात जायचे. आम्ही गेलो तेव्हा थंडीचे दिवस होते गार पाण्यात पाय कसे बुडवायचे म्हणून मी पाय न धुता बाजूने जायला लागले, तर दोघेजण ह्या सगळ्याकडे लक्ष देत उभे होते. त्यांनी अत्यंत नम्रपणे पाय धुवायला सांगितले. नाइलाज म्हणून मी पाय बुडविले तर पाणी बरोबर गरम होते. मला हा आश्चर्याचा धक्काच होता. चप्पलस्टॅण्डपासून गार लागू नये म्हणून कार्पेट आणि पाय धुवायला गरम पाणी! भक्तांची इतकी काळजी ती सुद्धा अगदी नम्रपणे. खूप भावली मनाला. आत भरपूर गर्दी होती पण कुठेही गडबड गोंधळ, अस्वच्छता,ढकलाढकली कुठेही नव्हती.
चोवीस तास अन्नदान ....लंगर सुरू असते. पण खाऊन इकडे तिकडे टाकलेल्या पत्रावळी किंवा उरलेले अन्न किंवा इतर कचराही कुठे दिसत नाही. गुरुद्वाराचा परिसर खूपच मोठा आहे. भक्तांनी सेवा मागून घेतलेल्या असतात, नवस बोललेले असतात त्याप्रमाणे ते शांतपणे सुरू असते. प्रचंड गर्दी असते, चोवीस तास वर्दळ असते पण एक सुखद शांतता असते.

मंदिराच्या जवळच जालियनवाला बाग आहे. ब्रिटिश अत्याचाराच्या खुणा पाहून आजही रक्त उसळते. इतिहासाच्या खुणा जपलेल्या आहेत. ठीक ठिकाणी त्याबद्दलची माहिती लिहून ठेवलेली आहे. आजूबाजूची बाग छान आहे.

पंजाबी शहराचे वर्णन आणि खायच्या पदार्थांची आठवण नाही असे कसे होईल. अमरीतसरी नान,आलू पराठा, छोले भेटुरे,....आणि हो लस्सी😋😋😋

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस