स्मितानुभव#6 निरागसता-कुहू

अगदी ताजी गोष्ट आहे.12 एप्रिलची. तारीख लक्षात राहायचे कारण म्हणजे यजमानांचा वाढदिवस होता.
कुहू आणि मी शेजारी शेजारी बसलो होतो. कुहू च्या हातात i pad होते. ती त्यावर काहीतरी बघत होती. i pad वर ती अगदी लहान म्हणजे एक दिड वर्षाच्या आतले व्हिडिओ रेकॉर्डडेड आहेत. मधून मधून ती ते बघत असते.मी तिला म्हटले की नीट धर i pad ,नाहीतर पडेल.

अचानक कुहू मला म्हणाली " मी लहान असताना तू किती गोड गोड बोलत होतीस आणि आता बघ किती जोरात बोलतेस."मी फक्त हसले. ती माझ्या शेजारून उठली आणि दुसऱ्या खुर्चीवर उलटी रुसून बसली. ते सगळे इतके गोड भाव होते की बघतच बसले. तितक्यात यजमान घरी आले त्यांना दार उघडण्याच्या नादात कुहूकडे दुर्लक्ष झाले. जस्ट आम्ही काहीतरी बोलायला लागलो.

एकदम जोरात रडण्याचा आवाज आला "मी एव्हढी रुसले आहे आणि कोणी माझ्याकडे बघतच नाही." मामला एकदम गंभीर झाला. ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. माझे कान पकडून सॉरी म्हणून झाले, आजोबा आजीला रागावले तरी आमची रुसूबाई काही हसेना!
ती रडत असल्यामुळे मला जोरातच बोलावे लागत होते आणि ती परत परत म्हणत होती की तू आता जोरात बोलते. अर्ध्या पाऊण तासाने जरा शांत झाली. मी अगदी हळू आवाजात म्हटले " कुहू चॉकलेट घे."
ती म्हणाली "काय? जरा जोरात सांग ना." गाडी रुळावर आली होती. मग मी तिला समजावले की तू छोटी असताना आमच्या जवळच असायचीस हळू बोलून तुला ऐकू यायचे, आता तू घरभर खेळतेस ना! म्हणून आम्ही जोरात बोलतो. तुला रागावत नाही काही.
पटले बहुतेक ! येऊन पटकन पापा दिला आणि निर्मळ हसली.

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस