स्मितानुभव #57 26 जुलै दुसरा दिवस
पाऊस म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. उन्हाने तप्त झालेल्या धरती पासून सर्वजण पावसाची उत्सुकतेने वाट पहात असतात. वेळेवर सुरु झालेला पाऊस म्हणजे वर्ष सुखात जाण्याची नांदीच जणू.
पण हाच पाऊस जेव्हा अक्राळविक्राळ रूप धारण करतो तेव्हा कालच्या (26 जुलै 2005 ) सारखी घटना घडते. निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही, पण माणसाने आपल्या सद्वर्तनाने त्यावरही मात केलेली मी अनुभवली आहे.
अतिवृष्टीमुळे लोकल बंदच झाल्या होत्या,त्यामुळे यजमान बँकेतच राहीले होते. सगळीकडचा वीजप्रवाह बंद होता. ज्यांचे मोबाईल फोन charged होते ते जपून वापरत होते. कुलाबा आणि फोर्ट भागातील स्टाफ त्यादिवशी फोर्ट शाखेत राहीला होता. ती तीन मजली इमारत आहे. दोन मजल्यावर पुरुष सदस्य राहीले आणि एका मजल्यावर स्त्री सदस्य. बँकेत एक खेळाडू मॅडम होत्या, त्यांनी स्पोर्ट्स क्लबमधून सगळ्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय केली. मैत्री,आपलेपणा कसा निभवायचा ह्याचे हे जिवंत उदाहरण आहे.
दुसऱ्या दिवशी दुपारनंतर दादरला जाण्यासाठी लोकल सुरू झाल्या. परंतु दादरहून वाशी नवी मुंबईला येण्यासाठी काहीच वाहन उपलब्ध नव्हते,
म्हणून सगळ्यांनी ( तीन चार जण मित्र होते) चालायला सुरवात केली. सुदैवाने घरचा landline आणि यजमानांचा मोबाईल सुरू असल्याने त्यांनी तसे सांगितले.
हे अंतर साधारण 20 किलोमीटर आहे, त्यामुळे खूपच वेळ लागणार होता, पण दुसरा काही मार्ग पण नव्हता.
एव्हाना पाऊस कमी झाला होता. वीजप्रवाहपण सुरू झाला होता. टी व्ही वरील बातम्यांमुळे काय भयंकर प्रकार झाला आहे ते समजले. कित्येक लोक बेपत्ता होती. कित्येक जण डोळ्यांसमोर
मॅन होल मध्ये वाहून गेले होते. काहीजण स्वतःच्या गाडीत गुदमरून गेले होते. एकूण खूपच गंभीर प्रकार झाला होता. सुदैवाने आमच्या जवळचे,ओळखीचे आणि स्टाफ सगळे सुखरूप होते आणि घराच्या मार्गावर होते. पण हकनाक गेलेल्या लोकांसाठी मन आक्रंदत होते.
स्वयंपाक करून, पाणी तापवून ठेवून आम्ही यजमानांची वाट पहात होतो. शेजारच्या घरातपण तीच परिस्थिती होती. दोघी एकमेकींना धीर देत होतो.
साधारण सहाच्या सुमारास यजमान घरी पोहचले. इतके चालून आल्याचा थकवा चेहऱ्यावर अजिबातच दिसत नव्हता. मी सांगितले पट्कन आवरून या,जेवण तयार आहे. खूप भूक लागलीअसेल ना? यजमान हसले आणि म्हणाले की आंघोळ करून घेतो, पण अजिबात भूक नाही आहे. आवरून झाल्यावर त्यांनी सांगितलेली हकीगत ऐकून आजही त्या माणुसकी समोर नतमस्तक व्हावेसे वाटते.🙏🙏
चालत असताना त्यांना ठीक ठिकाणी लिफ्ट मिळाली होती. ज्याला जिथपर्यंत शक्य होते तितके सोडले होते. वाटेत ज्याला जे शक्य आहे ते खायला देत होते. देणाऱ्यात आबालवृद्ध सामील होते. कोणी आजीच्या मायेने देते होते तर कोणी बापाच्या काळजीने. त्यात केळी, बिस्किटे,खिचडी पासून वडापाव पर्यंत सर्व पदार्थ होते. नको म्हटले तर म्हणत होते की ठेवा बरोबर! कधी घरी पोहचाल काय माहीत?
ह्या सगळ्यात पैशाची कुठेही अपेक्षा नव्हती. गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता.
होती ती फक्त माणुसकी, प्रेम आणि आपुलकी.
आज इतक्या वर्षांनी सुद्धा त्या ज्ञात अज्ञात दात्यांना शतशः नमन करावेसे वाटते.
मुंबई काय चीज आहे! ते तिथे राहून, अनुभव घेतल्याशिवाय कळणारच नाही. तिथे राहते फक्त माणुसकी.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment