स्मितानुभव #56 26 जुलै

आयुष्यातील काही काही दिवस असे असतात की कितीही विसरायचे ठरवले तरी विसरुच शकत नाही. काही बरोबर गोड आठवणी असतात तर काही बरोबर कडू . 26 जुलै 2005 हा असाच एक  दिवस. ह्या दिवसाशी कडू आणि गोड दोन्ही आठवणी जोडलेल्या आहेत. कुठलाही मुंबईकर हा दिवस विसरुच शकत नाही. माझ्या पूर्ण कुटूंबाने हा दिवस अनुभवला आहे. चार जणांचे कुटूंब पण अनुभव वेगवेगळा....

खरंतर सकाळ नेहमी सारखीच होती. पाऊस कोसळत होता म्हणजे मुंबईत पाऊस कोसळतोच.
आम्ही सगळे नेहमीप्रमाणे बाहेर पडलो. मुले नेरुळ, मी वाशी नवी मुंबई आणि यजमान फोर्ट.

साधारण एक वाजता मैत्रिणींच्या मुलीचा फोन आला की लोकल बंद आहेत, मी स्टेशनवर अडकली आहे, घ्यायला ये. हे पण नेहमीचेच  ....खूप पाऊस झाला की लोकल बंद.... पाणी ओसारले की गाडी रुळावर....

माझी बँक पहिल्या मजल्यावर होती, त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज आला नव्हता. साधारण 3 वाजता माझ्या मुलीचा फोन आला कॉलेज सोडून दिले आहे कारण खूप पाऊस पडतो आहे. मी बसने घरी निघाले आहे. बस चालू आहेत.
थोड्यावेळाने मुलाचा फोन आला मी पण घरी आलो आहे. इथपर्यंत सगळे नॉर्मल होते.
साडे चारच्या सुमारास वाँचमन सांगत आला" गाडी निकलो। पानी भर रहा है।" नंतर पावसाचा जोर खूपच वाढला म्हणून साडे पाच वाजता घरी जायला निघालो. खाली आलो तर वाँचमन ओरडून म्हणाला " कबसे बोल रहा हूँ, कोई सूनता नाही है।देखो किताना पानी भर गया हैं।"
खरंच गुडघ्याइतके पाणी होते. वाशीत कितीही पाऊस असलातरी घोट्याच्यावर पाणी कधी आले नव्हते. त्यामुळे जरा काळजी वाटली. पाऊस खूपच होता. एवीतेवी छत्रीचा उपयोग नव्हताच, टाकली सरळ बंद करून आणि पावसाचा आनंद घेत घरी जायला निघाले.

बसस्टॉपवर खूप गर्दी होती. माझे घर चालत जाण्यासारखे होते. विचार केला कशाला बसमधली जागा अडवायची ? कोणी दूर जाणारे असतील ते जाऊ देत बसने! आपण चालत जाऊ. रस्ता दिसतच नव्हता. मॅनहोलच्या भीतीने रस्तादुभाजकावरून हळूहळू चालत चालत घराजवळ आले. पाणी अजूनच वाढले होते. मला आता मेन रोड सोडून वळायचे होते. रस्त्यावर वाहने तुरळकच होती म्हणून रस्त्याच्या मधून चालायचा निर्णय घेतला. पाणी कमरेच्यावर आले होते. घर जेमतेम 100 मीटरवर होते. मन घराकडे ओढत होते पण पाणी .....पायाला तसे करू देत नव्हते. पाण्याला जबरदस्त ओढ होती. एक क्षण मनात आले की बाप रे आपण घरी जाऊ शकू ना?
तेव्हढेसे अंतर पार करायला जवळजवळ 15 मिनिटे लागली. हुश्य करत बिल्डिंगमध्ये पोहोचले.  आमची बिल्डिंग उंचावर असूनही पार्किंगमध्ये फूटभर पाणी होते. नक्कीच काहीतरी वेगळे संकट उभे होते.
माझे घर सहाव्या .....शेवटच्या मजल्यावर होते. नशिबाने लिफ्ट चालू होती. घरात गेले तर लेक घरात आलेले पाणी काढून काढून दमली होती. शक्य आहे तिथून तिथून पाणी गळत होते.
चिरंजीव मित्रांना मदत म्हणून बसस्टॉप आणि रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले होते.
टिव्ही लावल्यावर खरी परिस्थिती समोर आली. पाऊस, भरती आणि धरणाचे सोडलेले पाणी ह्यामुळे सगळीकडे हाहाकार झाला होता. पूर्ण मुंबई जलमय झाली होती.
थोड्यावेळाने वीजपुरवठा बंद झाला. बरेच landline बंद झाले. सुदैवाने आमचा फोन सुरू होता. मी यजमानांना फोन करून सांगितले की जबरदस्त पाऊस पडतो आहे तुम्ही रिस्क घेऊन येऊ नका. तिकडेच रहा. त्यांनाही आतमध्ये असल्याने बाहेरची हकीगत माहीत नव्हती. ते म्हणाले "मला निघायला अजून वेळ आहे,तो पर्यंत सगळे सुरळीत होईल."

माझी मैत्रीण आणि तिचे यजमान दोघेही फोर्टच्या बाजूला होते. तिची 12/ 13वर्षांची मुलगी एकटीच घरी होती, म्हणून तिला फोन केला की दादाला तुला घ्यायला पाठविते. तर ती म्हणाली की नको मावशी, पाणी खूप आहे दादांच वाहून जाईल. मी थांबते शेजारी......... प्रचंड प्रमाणात पाण्याची पातळी वाढली होती.

नऊ वाजता यजमानांचा फोन आला की मी इकडेच राहतो ,घरी येणे शक्य नाही. बीना मॅडम....(तिला आम्ही आधुनिक हिरकणी म्हणायचो) रेल्वे स्टेशनहून परत आल्या आहेत, लोकल सुरू होण्याचे काही लक्षण नाही. आणखी दहा बारा लोकांची नावे सांगितली की जे घरी येऊ शकत नाहीत आणि त्यांच्या घराचा फोन लागत नाही.
नंतर दोनतीन तास आम्ही टेलिफोन एक्सचेंज सारखे काम केले. बँक quarters असल्याने बिल्डिंगची डिरेक्टरी होती. त्यानुसार फोनवरून किंवा प्रत्यक्ष जाऊन सांगत होतो.
रात्रभर पावसाचे कोसळणे चालूच होते. कसेबसे आडवे झालो....इतके गळत होते की आम्हाला तिघांना झोपायला जागाच नव्हती....केव्हाही कुठूनही पाणी येईल असे वाटत होते. कशीबशी रात्र काढली.....अविस्मरणीय....नक्की काय काय झाले ते दुसऱ्यादिवशी समजले.
#smitanubhav 56

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस