स्मितानुभव #55   जतचे वसतिगृह

निसर्गाची जपणूक हा सध्याचा ऐरणीवरचा विषय आहे. तज्ञ, प्रतिथयश कलाकार,जाणकार आपापल्यापरीने झाडे लावा,झाडे जगवा. पाण्याचा वापर जपून करा. पाणी जमिनीत मुरवा. पावसाचे पाणी जमिनीत जिरेल अशी सोय करा अश्या अनेक गोष्टींचा प्रसार करत आहेत, जेणे करून सामान्य जनतेपर्यंत हा संदेश पोहचेल.

हे सगळे प्रत्यक्षात आणणाऱ्या एका छोट्या व्यक्तीला मी प्रत्यक्ष भेटले आहे. तिचे काम जवळून पाहिले आहे. हे लिहिणे ठरवून चालू केलेले नसल्यामुळे ना माझ्याजवळ तिचा व तिच्या कामाचा फोटो आहे, ना तिचे नाव माझ्या लक्षात आहे. एक मात्र खरं तिचे काम कायमचे मनावर कोरले गेले आहे.

मागच्यावर्षी मी जतला (सांगली जिल्हा) मावशीकडे गेले होते. तिकडे बघण्यासारखे नवीन काहीच नाही. मावशीने मला एका निवासी मुलींच्या वसतिगृहात नेले आणि तेथील रेक्टरशी माझी ओळख करून दिली. ती एक तरुण मुलगी होती. साधारण तीस बत्तीस वर्षाची. M S W करून तिने ही नोकरी स्वीकारली होती. कुटूंबापासून दूर राहून तिची नोकरी चालू होती.

जत हा दुष्काळी आणि कोरडा प्रदेश आहे. पाऊस इकडे क्वचितच पडतो. घरोघरी लावलेली झाडे सोडली तर सगळीकडे उजाड माळरान दिसते.

ह्या विदुषीने वसतीगृहाचा अधिकार स्विकारल्यापासून ह्या सरकारी वसतिगृहाचा कायापालट करायला सुरुवात केली. इथे येणाऱ्या मुली जवळच्या खेडयातील, गरीब घरातील असल्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी शिकविणे हे मोठे जिकरीचे काम होते. ते तर त्यांनी पार पाडलेच आणि त्याबरोबरच रांगोळी काढणे, पाहुण्याच्या स्वागताची तयारी करणे, मिटिंगची तयारी करणे ह्या गोष्टीपण शिकविल्या.

इथे जवळपास 150 मुलींची सोय आहे. ह्या विदुषीने आंघोळीला वापरले गेलेल्या पाण्याचा उपयोग करून, वसतीगृहाच्या आजूबाजूस नंदनवन फुलविले आहे. छोट्या फुलझाडापासून ते आंबा,नारळ,अगदी ऊस सुद्धा इथे लावला आहे.
सुंदर वाफे करून गुलाब,मोगरा,अबोली अशी झाडे लावली आहेत. कुंपण पण छोट्या छोट्या फुलझाडांचे केले आहे. इतर संस्थांना त्या स्वतः फोन करून कटींग घेऊन जा सांगतात आणि त्याची जोपासना कशी करायची ते पण शिकवितात.

शहरात आपण खेड्यातील गोष्टींचा आंनद घेण्यासाठी भरमसाठ पैसे मोजतो. ह्या ताईंनी नैसर्गिक गोष्टी वापरून झोपडीवजा बैठकीच्या जागा केल्या आहेत. ते इतके सुंदर दिसते की वरिष्ठ अधिकारीसुद्धा बंद ऑफिस मध्ये बसून चर्चा करण्यापेक्षा ही hut पसंत करतात.

आम्ही सुद्धा इथेच बसून बागेतील लिंबाच्या सरबतचा आस्वाद घेतला. सोबत घरट्यात परत येणाऱ्या पक्षांचा किलबिलाट होता. मी इतकी भारावून गेले होते की ना माझे वेळेकडे लक्ष होते ना इतर गोष्टींकडे. त्याच ओघात मी त्यांचे नाव पण विसरले.

"इच्छा तिथे मार्ग आणि केल्याने होत आहे रे"

ह्या दोन्ही उक्तीचा प्रत्यय मला त्या एका
संध्याकाळने दिला.

#smitanubhav 55

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस