स्मितानुभव #53  साहित्य स्नेह

       अजूनही आहे मी कालच्याच धुंदीत
        साहित्य स्नेह पाहुनी झाले मंत्रमुग्ध
        भाषा प्रेमाला नाहीत कसलेच बंध
         माय मराठी ठेवेल असेच अनुबंध
                     📖📚🖋️📝

काल दुपारी आम्ही बेंगलोर मध्ये सातजणी साहित्यप्रेमी भेटलो होतो. नुकताच आम्ही व्हाट्सअप्प ग्रुप केलाय " साहित्य स्नेह " स्वरचित कविता, लेख, इतर दर्जेदार साहित्य असे काही पोस्ट करत होतो, एकमेकींना दाद देत होतो पण समाधान होत नव्हते. माणिकताई पटवर्धन यांनी पुढाकार घेतला आणि भेटीचे आयोजन केले.
माझी पहिली भेट हुकली पण काल भेटले.

नर्मदा काकू आणि माणिकताई च्या व्यक्तीमत्वाने मी भारावून गेले. नर्मदाकाकू 75 च्या आसपास आहेत आणि अमराठी आहेत. मराठी साहित्य आवडते म्हणून आवर्जून त्यांनी त्यांच्याकडे भेट ठेवली. त्यांच्या उत्साहाला मनापासून सलाम!

माणिकताईंचा जन्म, शिक्षण सगळे बेंगलोरला कानडी माध्यमातून झाले. तरीही त्यांना मराठीची नितांत ओढ आहे. आपली भाषा आपण टिकवली तर पाहिजेच पण पुढेही नेली पाहिजे असा त्यांचा विचार आहे. त्यांचा " धर्मसंकट " हा मराठी कथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. वेगवेगळ्या स्पर्धात बक्षीस मिळालेल्या कथांचा संग्रह आहे तो.
आपल्या मराठी प्रेमाचे श्रेय त्या त्यांची आई 
मा. सरस्वती रिसबुड यांना देतात. आई पण लिहितात,अनुवाद करतात. त्यांच्या भेटीची ओढ लागली आहे. परप्रांतात राहून हे सगळे करणे खूप कठीण आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अजूनही खूप पैलू आहेत. हळूहळू उलगडतील.

अवघ्या दोन अडीच तासांत सगळ्यांबद्दल कळणे शक्यच नाही. काल फक्त तोंड ओळख झाली.
मी बँकर, अपर्णा डेंटिस्ट, सरोज ताई शिक्षिका, श्रीकला आणि मानसी हरहुन्नरी ....सामायिक धागा मराठीचे प्रेम...एक उमलती लेखिका भाग्यश्री पण आमच्या ग्रुप मध्ये आहे. काल तिची भेट नाही होऊ शकली. होईल लवकरच.

पुढच्या भेटीची आस मनात ठेवून आम्ही निरोप घेतला.

         नर्मदेत सरोज उमलले
         श्रीकला ने माणिक आणले
         भाग्यश्रीची उणीव भासली
         अपर्णाने भरून काढली
         स्मिता मानसी उत्सुक भेटीसाठी
    हेच ते ऋणानुबंध सदैव राहोत रेशीमगाठी
    आमची माय मराठी आमची माय मराठी
              🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस