स्मितानुभव #52 लपाछपी

आबालवृद्धांना आकर्षित करणारा खेळ म्हणजे
               "लपाछपी/ बुवा कुक "
हा खेळ खेळला नाही असा माणूस ह्या जगात नसेल. अगदी बालपणापासून हा खेळ सगळ्यांना आनंद देतो. ह्या खेळला ना जागेची जरूरत, ना साहित्याची, ना अमुक इतक्या खेळाडूंची. असेल तसे,असेल तिथे, असतील तेव्हढे जण खेळू शकतात. मी तर ह्या खेळाचा आनंद आजपर्यंत घेत आहे.
कल्पना करा की आपण बसमधून जात आहोत, समोरच्या सीटवर गोड गोंडस बाळ बसले आहे.
सहज एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून बघा, लगेच खेळाला सुरवात आणि वर खदखदून हास्याची मेजवानी.
लहान असताना सगळी भावंडं जमलो की लपाछपी ठरलेली. सापडू नये म्हणून काय काय क्लुप्त्या लढवायचो. कपडे, चप्पल बदलायचो. जीवाची पर्वा न करता नवीन नवीन लपण्यासाठी जागा शोधायचो. धमाल यायची. आता लिहिताना सुद्धा धपका घालण्यासाठी केलेली धावपळ आणि खाल्लेले धपके सर्रकन डोळ्यासमोर आले.

एकदा आम्ही सगळे ट्रिपला राजस्थानला गेलो होतो. स्थलदर्शन करून परत आल्यावर आम्ही हॉटेलमध्ये लपाछपी खेळलो होतो. लपायच्या जागा कमी होत्या. हर्षदने त्याचे बूट काढून पडद्यामागे दिसतील असे ठेवले आणि स्वतः दुसरीकडे लपला. बाप रे! हसून हसून आमची मुरकुंडी वळली.

आजी आजोबा,पणजी पणजोबा बसल्या जागेवरून बाळाला खेळवू शकतात. आपल्याच हाताने आपला चेहरा झाकायचा आणि बुवा कुक करायचे, निर्मळ हास्याचे फवारे उडालेच म्हणून समजा.
बाळ जरा मोठे झाले की आपले आपणच सुरू करते बुवा कुक ची मजा घ्यायला. ते बघताना आपण पण आपले वय विसरून लहान होऊन जातो.
सध्या नातीबरोबर वय विसरून सगळे कुटुंब ह्या अवीट गोडीच्या खेळाचा आनंद घेत आहे.
#smitanubhav 52

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस