स्मितानुभव #51 पालकत्व

पालकत्व ही एक अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक मूल वेगळे, त्याचे प्रश्न वेगळे, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी, आवड निवड वेगळी....
माझी जुळी असल्याने मला जरा जास्तच कसरत करावी लागायची.
एक प्रकृतीने नाजूक तर एक मनाने, एक नीट जेवायचे तर एकाच्या सारखे मागे लागायला लागायचे. मूड कधी कसा होईल काही सांगता यायचे नाही. वेळही कमी असायचा. मी काही शक्कल काढली की त्यावर त्यांचे नवीन काहीतरी असायचेच. त्यांचे त्यांना समजू लागेपर्यंत तर खूपच गंमती जमती घडायच्या.
एकदा स्नेहा म्हणाली की डब्यात फोडणीचे पोहे दे. मी म्हटले की डब्यात गार होतात. रविवारी सकाळी करू या. नाश्त्याला मी पोहे केले आणि दोघांना हाक मारली. आज बाईंचा मूड नव्हता. ताटली समोर ठेवून बसून राहिली होती. हर्षदने खायला सुरू केले होते. "अग तुझ्यासाठी केले ना मी पोहे? का खात नाहीस?"
स्नेहाने काही उत्तर देण्याच्या आधीच हर्षदने ताटली पुढे सरकवली आणि म्हणाला," तिच्यासाठी केलेस ना? मग मला नको जा. "
दोघांची समजूत घालून खायला घालेपर्यंत मला पुरे झाले.
स्नेहाला खायचा पदार्थ समोर येईपर्यंत खूप उत्साह असायचा. समोर आले की बाई ढेपाळायच्या.
पूर्वी चिंचवडला फक्त रविवारीच पॅटिस मिळायचे. उठली की सुरू करायची "बाबा पॅ ... पॅटिस "
थंडी,पाऊस काही असो बाबा लगेच निघायचे पॅटिस आणायला. आणल्यावर अर्धा सुद्धा खायची नाही. मी तसे म्हटले की गाल फुगवून रुसून बसायची. पुन्हा रविवारी पॅ ....टिस सुरू!
थोडी मोठी झाल्यावर आपापले वाढून घेऊ लागली. स्नेहाला नेहमी वाटायचे हर्षदच्या ताटलीत जास्त आहे. पुढे संपले नाहीतरी चालेल,पण घेताना तिला जास्त लागायचे. मग मी एक युक्ती सांगितली," जो वाढेल त्याच्या दुसऱ्याने आधी घ्यायचे." थोडे दिवस हा फंडा चालला. एकदिवस एकच लाडू होता. मी वाटीत घालून दिला आणि म्हटले की घ्या अर्धाअर्धा ! वाटी मध्ये ठेवून दोघे बघत बसले. वाटणी कोणी करायची म्हणून!🤦‍♀
जोरात भांडणे किंवा मारामारी कधी केली नाही दोघांनी. लटके रुसवे फुगवे चालायचे.
आजही असे किस्से आठवले की नकळत हसू येते!
रम्य ते बालपण!
#smitanubhav 51

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस