स्मितानुभव #50 डॉक्टर
कालपासून विचार करत होते, 50 वा अनुभव लिहायचा आहे. विषय काहीतरी विशेष घ्यावा. सकाळी फेसबुकवर "Doctor's Day" आहे असे कळले. जीवनात आलेल्या असंख्य डॉक्टरांना मनोमन वंदन केले आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या.
सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर आले ते डॉ. नातू.
अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्त्व. निळे घारे डोळे आत्मविश्वासाने चमकत असायचे. सदैव पांढरे शुभ्र कपडे. ते आमचे फॅमिली डॉक्टर. सकाळचा दवाखाना झाला की ठरलेल्या घरी व्हिजिट. आठवड्यात चार वेळा तरी येणारच. आजी आजोबांना तपासणार! कधी मूड असेल तर चहा घेणार. आम्ही रोज दोन चाफ्याची फुले त्यांच्यासाठी काढून ठेवायचो, ती घेऊन पुढची व्हिजिट. ध्यास एकच पेशंट लवकर बरा झाला पाहिजे. दवाखाना सदैव भरलेला असे. अर्धे दुखणे त्यांच्या दर्शनानेच बरे व्हायचे. डॉक्टर कंपाऊंडर सगळे तेच. "डॉक्टर डोकं दुखते आहे. औषध द्या"
" बाजूला काढून ठेवा " असे म्हणत गोळ्या बांधून हातात. नाडी परीक्षा उत्तम. फारसे काही सांगायला लागायचेच नाही. हाताला विलक्षण गुण होता. ते असे पर्यंत स्पेशालिस्टकडे गेल्याचे आठवत नाही.
डॉ. सुशीला दाते हे पण असेच उद्दात व्यक्तिमत्त्व. मूर्ती लहान पण कीर्ती महान. स्त्री रोगतज्ञ. स्वभाव अतिशय कडक. स्वच्छता टापटीप ह्या बाबतीत कुणालाही सवलत नाही. हॉस्पिटलचे नियम अतिशय कडक आणि ते पाळले जातात की नाही ह्याकडे बारीक लक्ष. ध्येय आणि उद्देश एकच पेशंटची काळजी. बाकी सगळे दुय्यम.
नंतर नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणच्या डॉक्टरांची ओळख झाली. काही त्याच्या व्यक्तीमत्वामुळे किंवा विशिष्ट सल्ल्याने कायमचे लक्षात राहिले आहेत.
मुले लहान असताना डॉ. ढेकणे आणि डॉ. बोरा ह्यांचा खूप आधार वाटायचा. कधी कधी डॉक्टर भेटायचे नाहीत, तरी दवाखान्यात नेऊन आणल्यावर मुलांना बरे वाटायचे. वेळी अवेळी फोन केला तरी लगेच मदत मिळेल ही खात्री वाटत असे.
मुंबईला गेल्यावर डॉ.चिंदरकर...होमिओपॅथी डॉक्टर. कधीही फोन करा योग्य औषध आणि योग्य सल्ला. स्नेहा तर प्रत्येक परीक्षेच्या आधी डॉक्टरना भेटूनच यायची.
डॉ.आरोसकर आणि डॉ. खरे तर जणू देवदूत म्हणूनच माझ्या आयुष्यात आले. किती नावे घेऊ?
डोळ्यांचे डॉक्टर, दातांचे डॉक्टर,ENT, आणि सर्वच....
मला ह्या सुंदर जगात येण्यास मदत करणाऱ्या डॉ. सुशीला दाते यांच्यापासून आजपर्यंत मला तंदुरुस्त राहण्यास साहाय्य करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांचे मनापासून आभार आणि शतशः नमन
🙏🙏🙏🙏🙏
#smitanubhav 50
Comments
Post a Comment