स्मितानुभव#5 नेपाळ-2
आता शाळा नाही, अभ्यास नाही, दिवसभर नुसती दंगा मस्ती आणि खेळ आणि त्यात आई बरोबरच दादा पण असणार ह्या गोड कल्पनेने सकाळी जाग आली.
आमचे घर डोंगरावर होते. लहानपणी जसं आपण निसर्गचित्र काढायचो ना? तसंच दृश्य आमच्या घरासमोर होते. दोन डोंगर, त्यातून अखंड वाहणारी कोसी नदी, उगवणारा सूर्य, डोंगरावरची घनदाट झाडी (जंगलच होते ते) ते इतके सुंदर होते की अजूनही ते माझ्या डोळ्यासमोर आहे.
पण आमचा वावर जास्त मागच्या दारातून होता, कारण गाव त्या बाजूला जरा खालच्या भागात होते. वीस पंचवीस घर दोन किंवा तीन डोंगराच्या दरीत होती. तेवढेच गाव होते. दोन डोंगरमधून नदीकडे जाणारी पाय वाट होती. नदीचा किनारा आणि पात्र दोन्ही ही विशाल होते.
त्या दुसऱ्या डोंगरावर दादांचे ऑफिस होते.बहुधा ते ऑफिसमध्ये एकटेच असावेत. त्याच्या बाजुने गावाबाहेर जाण्याची पायवाट होती, त्या रस्त्यावर आणि गावात पाच सहा छोटी छोटी दुकाने होती.
पायवाटेच्या डाव्याबाजूला परत डोंगर होता, तो थेट आमच्या घरापर्यंत होता.
आमच्या डोंगरावर चार पाच मोठी घर होती, बहुदा ते सरकारी निवासस्थान असावे. घरं संपली की मोठे हिरवेगार पठार होते आणि त्याच्या शेवटी एक ऑफिस होते. बस इतकेच गावं. सगळी मिळून 50 तरी माणसे होती की नाही देवजाणे. गावात वराह भगवान चे देऊळ होते (विष्णूचा अवतार).
घराच्या समोर व्हरांडा होता. मग दोन खोल्या, परत व्हरांडा, मागे मोकळी जागा मध्ये छोटी बाथरूम आणि थोडे खालच्या बाजूला स्वयंपाकघर आणि त्याला लागून मागचे दार.
सौ.आई स्वयंपाक चुलीवर करत होती. काय बनवत होती ? काय खात होतो ते नाही आठवत. रामबहादूर नदीवरून पाणी आणि जंगलातून लाकडे आणायचा. बाकी सामान कोण आणि कसे आणत होते ते मला माहित नाही.
फक्त एक दिवस शाळा आणि अभ्यास आता नाही ह्या गोड विचारात गेला. एकदिवसात आई स्थिरस्थावर झाली आणि दुसरे दिवशीपासून आमचे रुटीन सुरू झाले.
आई शाळेतील बाईनंकडून तीन महिन्याचा अभ्यासक्रम घेऊन आली होती. जणू काही शाळा सुरूच आहे असे वेळापत्रक तिने आखून दिले होते. फक्त रविवारी सुट्टी. बदल म्हणजे संध्याकाळी घरीच कॅरम,पत्ते, लुडो वगैरे खेळायचो आणि आई दादा पण आमच्या बरोबर खेळायचे.
वीज नव्हतीच. राम बहादूर येऊन कंदील साफ करून लावून जायचा. मग परवाचा म्हणायचा,जेवायचे आणि झोपायचे. आठवडी बाजारातून दादांनी शेकड्यानी संत्री आणली होती, दुपारी जेवण झाल्यावर 5 संत्री खात होतो.
तेवढ्या काळात कोसी नदीची जत्रा होती. बाकी संदर्भ आठवत नाही पण थंडगार पाण्यात बुडवून मला आणि नीताला आंघोळ घातली होती आणि दोघेही हळहळत बसले होते की आधी आपण बघायला पाहिजे होते पाणी फारच थंड होते.
तीन साडे तीन महिने कसे आणि कधी संपले ते कळलेच नाही, परत येऊन सरळ वार्षिक परीक्षाच
आता मागे वळून बघताना तुम्ही काय परिस्थितीत होतात त्याची कल्पना येते. संपर्काचे कुठलेच साधन नसताना तुम्ही दोघांनी किती मोठा त्याग केलात ते समजते. साडे पाच वर्षे दादा तिकडे होते. तुमच्या त्यागातून आम्हाला मिळालेला हा आठवणींचा ठेवा खरचं अमूल्य आहे.
Comments
Post a Comment