स्मितानुभव#5 नेपाळ -1




मुलांचे किस्से आठवता आठवता मी माझ्या बालपणात कधी पोहचले ते कळलेच नाही.

जवळजवळ 45 वर्ष मागे गेले. माझे वडील प्रभाकर बेहेरे (त्यांना आम्ही दादा म्हणतो) , हवामान खात्यात होते. 1967-1973 ह्या काळात ते नेपाळ येथील बराहक्षेत्र ह्या खेड्यात होते. मी, माझी धाकटी बहीण नीता आणि आई पुण्याला आजी आजोबांजवळ राहत होतो. मी तिसरीत असताना दिवाळीच्या सुट्टी नंतर तीन साडेतीन महिने आम्हीपण नेपाळला गेलो होतो.

चार दिवस रेल्वेचा प्रवास आणि एक दिवस चालत असे एकूण पाच दिवस लागायचे तिथे पोहचायला.
कुठली ट्रेन ते मला आठवत नाही, पण पाटणा, अलाहाबाद आणि मोगलसराई ही गावांची नावे लक्षात आहेत. गाडीत येणारे जेवण, स्टेशनवर गाडी थांबली की पाणी आणायला धावणारे दादा ,ते परत गाडीत येई पर्यंत झालेली तगमग, होलडॉल उघडून त्यावर झोपणे, गाडीत दात घासणे, दिवसभर पत्ते, लुडो खेळणे हे चांगले आठवते.
चार दिवसांनी आम्ही चतरा ह्या गावी संध्याकाळी पोहचलो. उतरल्यावर सुद्धा गाडीतच आहोत असे वाटत होते. दादांच्या बंगाली मित्राकडे आम्ही रात्री राहिलो. जेवायला भात आणि भाजी होती. घरी केलेले सगळे पानांत वाढायचे आणि वाढलेले सगळे खायचे हा आमच्या घरचा नियम होता. त्या काकू जेव्हा भाजी वाढायला आल्या तेव्हा आई नको म्हणाली. मी मनातून खूप खूष झाले. एकतर भाजी वांग्याची होती आणि माझ्या बालमनाला वाटले सगळे खायचेच हा नियम आता पाळायचा नाही.
दुसरे दिवशी सकाळी उठून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हा प्रवास 5 मैल चालत डोंगरातून होता. बाजूला खाली वाहणारी कोसी नदी दिसत होती. कसे पोहोचलो, वाटेत दमलो का, थांबलो का ते आठवत नाही. परंतु प्रवासभर दादा "नीट बघून चाला,उतरत्या दगडावर पाय ठेवू नका"   असे सांगत होते. माझ्या मनातून आई भाजीला नको म्हणाली ते अजून गेले नव्हते. मी आईला विचारले "काल तू मला भाजी खायची सक्ती कशी केली नाहीस? घरचे नियम आता पाळायचे नाहीत का ?"
क्षणातच आईने मला जमिनीवर आणले. ती म्हणाली "ती वांग्याची भाजी नव्हती, ते मासे होते आणि आपण मासे खात नाही. घराचा नियम सगळीकडेच पाळायचा असतो. तो तुमची वाढ चांगली व्हावी,पूर्ण पोषण मिळावे म्हणून आहे."
बहुधा निराशेने मी पुढे चालायला लागले असणार. नीता, माझी छोटी बहीण जेमतेम साडेपाच वर्षाची होती. ती पूर्ण चालली का?का तिला उचलून घेतले होते ते आता आठवत नाही. पण बरोबर एक रामबहादूर नावाचा नेपाळी नोकर होता. तो आम्हाला घ्यायला आला होता अर्थातच चालत. संध्याकाळपर्यंत आम्ही सहीसलामत घरी पोहोचलो होतो. खूप दमलो असल्याने लगेच झोपलो असू बहुतेक. पण वांग्याची भाजी काही डोक्यातुन गेली नव्हती.

आम्ही तिथे तीन साडे तीन महिने राहिलो.बाकीची आठवण उद्या .....
#smitanubhav 5

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस