स्मितानुभव #49 जबाबदारीची जाणीव

इंटरनेटचे जाळे जास्त पसरले नव्हते तेव्हाची, साधारण 2006 ची गोष्ट आहे. माझ्या ब्रांचच्या बाजूला पहिल्या मजल्यावर cyber cafe आणि व्हिडिओ पार्लर होते. तेथे नेहमीच कॉलेजच्या मुलामुलींची गर्दी असायची. त्याच्या बाहेर नेहमीच आरडाओरडा सुरू असायचा.

एकेदिवशी खूप जोरात काच फुटल्याचा खळकन्
आवाज आला, नजर बाहेर गेली तेव्हा रक्ताची चिळकांडी हवेत उडलेली दिसली आणि पाठोपाठ धपकन पडल्याचा आवाज आला. माझी तरी बाहेर जाऊन बघायची हिंमत झाली नाही. तितक्यात तिथे गर्दी पण जमली.
सायबर कॅफेत काही मुले खेळायला आली होती.
काही कारणावरून त्यांच्यात वादावादी सुरू झाली. बघता बघता त्यांच्यात मारामारी सुरू झाली. त्या गडबडीत एक मुलगा जिन्यावरून गडगडत खाली आला. त्याच्या वेगात येण्याने दुकानाचे काचेचे दार फुटले आणि त्या मुलाची पाठ अक्षरशः चिरली गेली आणि रक्ताची चिळकांडी उडाली. प्रसंगावधान दाखवून लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेले.
दुसऱ्या दिवशी मी सहजच सायबर कॅफेच्या
मालकाला विचारले की तो मुलगा आता कसा आहे? तो म्हणाला ," मॅडम काही विचारू नका, फुकटचा मनस्ताप झाला. माणुसकी म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, घरचे आले की त्यांच्या स्वाधीन करायचे आणि परत यायचे असा साधा विचार होता. जवळजवळ संध्याकाळपर्यंत अडकलो."
झाले होते असे की जखमी मुलगा पश्चिम मुंबईत
रहाणारा होता. मित्रांनी त्यांच्या वडिलांना फोन करून सांगितले की खारघरला अपघात झाल्याने त्याला खूप लागले आहे आणि हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे तुम्ही लवकर या. वडील म्हणाले हे शक्य नाही, तो खारघरला जाण्याचे काहीच कारण नाही. त्याचे कॉलेज तिकडे नाही,आमचे कुणी नातेवाईक अथवा त्याचे मित्र कुणीच तिथे राहत नाही. तुम्ही खोटे सांगत आहात, मी येणार नाही.
इकडे हॉस्पिटलमध्ये पालक कुठे म्हणून सारखे विचारत होते आणि वडील ऐकत नव्हते. शेवटी मित्र त्यांना जाऊन घेऊन आले आणि मालकाची सुटका झाली. सुदैवाने मुलगा बचावला होता.

आईवडील नेहमी सांगायचे की कुठे जाताय? काय
करताय? ते घरी माहीत पाहिजे. मी स्वतः अशी बेजबाबदारपणे कधीच वागले नव्हते, त्यामुळे आईवडील असे का सांगतात त्याचे महत्व कळले नव्हते. ह्या प्रसंगाने माझ्यातील आई सतर्क झाली. तशी माझी मुले पण न सांगता काही करत नव्हती. खबरदारी म्हणून झाला प्रकार मी लगेच मुलांना सांगितला आणि असे काहीही न करण्याबद्दल बजावले.
पुढच्याच ठेच मागचा शहाणा!

#smitanubhav 49

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस