स्मितानुभव #48  माझ्या दृष्टीतून.... प्रथा परंपरा

लग्नानंतर पहिल्या वर्षी सगळ्या प्रथा,परंपरा सण ह्या सगळ्यांबद्दल खूप उत्सुकता असते. इतके दिवस ऐकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष करायच्या असतात. पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ घालण्यासाठी आई बरोबर देवळात गेले. इथे आईने सांगितले मी केले. पूजा करून झाल्यावर आई म्हणाली," तांदूळ मुठीत घे,आणि म्हण शिवा शिवा महादेवा.... नावडतीची आवडती कर! मग तांदूळ वहा. असे तीनदा कर." एक क्षण आई पण भांबावली. मला ते पटले नाही,तरी मी तसे तीन वेळा केले. सगळे तांदूळ पाण्यातून वाहत गेले.
दोघीही न बोलता घरी आलो. मी काही न बोलताच, मला काय म्हणायचे आहे ते आईच्या लक्षात आले.
ती म्हणाली," मनाला न पटणारी कुठलीच गोष्ट कधी करू नकोस. आपल्या प्रथा,परंपरा ह्या पूर्वजांनी विचारपूर्वक निर्माण केलेल्या आहेत. त्याला काळानुरूप आपण नवीन स्वरूप द्यायला हवे."
एक तर आमचा प्रेमविवाह, त्यामुळे नावडती असण्याचा प्रश्नच नाही आणि जवळजवळ पाव किलो किंवा जास्तच तांदूळ वाया गेले. ह्यावर आईनेच उपाय सुचविला, जे धान्य सांगितले आहे ते गरजूला दान कर. पुढे असेच माझ्या बहिणींनीही केले.
आईच्या शिकवणीतून माझ्या विचाराला वेगळी दिशा मिळत गेली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मूळचा विचार काय आणि त्यात आपण कालानुरूप काय बदल करू शकतो ह्याचा मी नेहमी प्रयत्न करते.

आंघोळीनंतर तुळशीला पाणी घालणे....सरळ सोपा अर्थ काढला मी... पूर्वी आंघोळी लवकरच व्हायच्या, तुळशीपाशी ऑक्सिजन खूप आणि वरून कोवळी सूर्य किरणे ....झाले ना warm up, आपोआपच व्हिटॅमिन D ची सोय आणि दिवसभरची ऊर्जा.....
आजच्या काळात हे सगळ्यांना शक्य नाही ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. हे मी एक उदाहरण दिले. ज्यांना शक्य त्यांनी हे जरूर करावे.
आपल्या परंपरांची खिल्ली उडविण्यापेक्षा त्यामागचा विचार करून त्याला कालपरत्वे नवीन स्वरूप देणे इष्ट नाही का?

#smitanubhav 48

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस