स्मितानुभव#47 वटपौर्णिमा माझ्या दृष्टिकोनातून



लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला मी ट्रेनिंगसाठी
बेळगावला होते, तेव्हा काही फोन वगैरे इतके काही नव्हते. त्या दिवशी नेमके काय काय केले? उपास केला कि नाही ? ते आता आठवत सुद्धा नाही. परत आल्यावर मात्र आईने सांगितले की हे वाण, मी तुझे म्हणून काढून ठेवले आहे कुणा गरजू बाईला देऊयात. आईने सांगितले मी केले, त्यावर तेव्हा मी फारसा विचार केला नाही.

मी कॉमर्स पदवीधर आहे. माझा शास्त्राचा काहीच अभ्यास नाही. इतकी झाडे असतांना वडाचीच पूजा का? बारा पौर्णिमा येतात मग ज्येष्ठच का?
हे व्रत आहे आणि तीन दिवस आहे. बाकी बऱ्याचशा पूजा घरातच केल्या जातात, मग हीच पूजा बाहेर जाऊन का? असे बरेच विचार मनात आले.
निरीक्षण केल्यावर लक्षात आले की पावसाळा नुकताच सुरू झालेला असतो. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण सुरू असते. पूर्वी काय किंवा आता काय कोणीही सहज म्हणणार नाही की जा ग बाई बघ किती सुंदर फुलला आहे निसर्ग, बघ तो नवनिर्मितीचा उत्सव. स्त्रीला ही हे पटणारे नाही की हातातले काम सोडून निरखत बसायला. देवाची आणि पूजेची जोड दिली की सगळ्या गोष्टी सोप्या होतात. वडाचे झाड बघितले की लक्षात येते त्याच्या पारंब्या खाली येऊन आपोआप जमिनीत रुजतात. वडाचे झाड अक्षय असते. आपले कुटुंब, सृष्टी, अवघा संसार असाच अक्षय राहू दे, हा विचार असावा ह्या पूजेमागे. कृतज्ञता व्यक्त करणे हा तर आपल्या भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र आहे.

माझ्या मते जगातील सर्वात सुंदर नाते आहे पतीपत्नीचे. बाकी सगळ्या नात्यांचा उगम ह्या नात्यातूनच होतो. पूर्वी स्त्रिया सर्वस्वी पतीवरच अवलंबून होत्या तो सुखी तर सगळे सुखी. हल्लीच्या काळात पतिपत्नी दोघांनीही हे व्रत करायला हरकत नाही. 😊
चांगले काम करायचे तर तन मन शुद्ध हवे म्हणून उपवास असावा.
वडाला दोरा बांधतात त्या मागेही सगळे सगेसोयरे एकत्र राहू देत हा विचार असावा.
पूर्वी घरात वडीलधारी माणसं असायची,त्यामुळे बायकांना मोकळे पणे वावरता यायचे नाही. मैत्रिणीत मिसळतात यायचे नाही. पूजेच्या निमित्ताने बाहेर पडले की आपोआपच हे सगळे करायला मिळायचे.
तेव्हा सगळ्यांकडेच पैसा कमी होता, त्यामुळे वाणाची आणि ओटीची पद्धत असावी. आता ज्याला त्याची खरचं गरज आहे त्याला मदत करावी.

मी स्वतः कधीच पूजा करू शकले नाही. पण मी उपवास आणि वाण हे दोन्ही करते. त्याबरोबरच मनोमन प्रार्थना करते ही सृष्टी अशीच सदैव बहरलेली राहो. वाण अर्थातच उपयोगी आणि
गरजूला.
त्यामुळे चेष्टा मस्करी न करता आपाल्या परंपरेचा आदर राखत स्वतःला पटेल अशी वटपौर्णिमा जरूर करावी प्रत्येकीनी!

सात जन्माचे कोडे काही उलगडले नाही अजून.☺️☺️
#smitanubhav47

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस