स्मितानुभव #46 कचऱ्याचे नियोजन

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी सुरू झाली,सगळीकडे चर्चेला,चेष्टेला उधाण आले.
कचरा ही फार मोठी समस्या आहे. अगदी प्रगत देशात सुद्धा ह्यावर उपाय सापडलेला नाही. फक्त प्लॅटिक नाही तर इतर कचरा ही त्रासदायक आहे.

मध्यंतरी आमच्या भागाची नगरसेविका सोसायटीत भेटायला आली होती. ती करत असलेल्या अनेक कामांबद्दल तिने माहिती दिली. तेव्हा तिने मुद्दा मांडला की " Minimize the Garbage ".
कचरा बंद होणे शक्य नाही. पण तो कमी कसा करायचा ह्या बद्दल प्रत्येकाने विचार केला तर निदान 50% कचरा कमी होईल.
तिने डीसपोझेबल ताटल्या,वाट्या,पाणी प्यायची भांडी हे कमी वापरा असे आवाहन केले. त्यावर उपाय म्हणून तिने 20 /20 चा असा सेट करून घेतले आहेत. गरजेनुसार नागरिक ते घेऊ शकतात, अट एकच की परत देताना स्वच्छ करूनच द्यायचे.
कल्पना अगदीच अनपेक्षित होती त्यामुळे तेव्हा त्यावर विशेष विचार केला गेला नाही.
"स्वच्छ करून द्यायचा"  ह्या मुद्द्यावरच गाडी अडकली. रोज येणारी बाई सहसा जास्त काम करायला, पैसे जास्त देऊन सुद्धा तयार नसते. अगदी हो म्हणली तरी सुद्धा प्रत्यक्ष येऊन काम करे पर्यंत धाकधूकच. बरे असे कार्यक्रम रोज नसतात त्यामुळे घरातील मंडळींनी आपले व्याप वाढवून ठेवलेले असतात. वेळेची कमतरता भासते.
आपोआपच डीसपोझेबल गोष्टी आणण्यासाठी प्रेरीत होतात. आपले पैसे जाणारच असतात,फक्त कुणाला इतकाच प्रश्न असतो. त्यामुळे सुरक्षित पर्याय निवडला जातो. आपल्यापुरता प्रश्न मिटवला जातो.
ह्यावर मला सुचलेला पर्याय असा की सोसायटीत किंवा आपल्या भागात काम करणाऱ्याची एक
यादी ( Data Base ) तयार करावी. कार्यक्रम आधीच ठरलेले असतात, त्यानुसार ज्याला गरज आहे त्याने/तिने येऊन काम लगेच करावे.

बेंगलोर मध्ये इको फ्रेंडली ताटे ,वाट्या,चमचे आणि केळीची पाने सुद्धा मुबलक प्रमाणात मिळतात. ते वापरून कचरा हा होतोच. शिवाय केळीची पाने वापरली गेली नाहीत तर वायाच जातात. हल्ली गाईला खायला देण्यावर पण बरीच बंधने आहेत.

इतर नको असलेल्या गोष्टी उदा. कपडे,रद्दी,लहान मुलांची खेळणी,दप्तर,चपला बूट चांगल्या स्थितीत असतानाच गरजू लोकांना द्यावेत. आपल्या कडून गोळा करून गरजूंना देणाऱ्या खूप सामाजिक संस्था कार्यरत आहेत, त्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी.

प्रत्येकाने परिस्थितीनुसार ह्यावर काही उपाय केला तर "स्वच्छ सुंदर भारत " व्हायला असा कितीसा वेळ लागेल!
# smitanubhav 46

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस