स्मितानुभव #45 योगदिन
ठेच लागल्याशिवाय अक्कल येत नाही ह्याचा प्रत्यय मला नुकताच आला. गेली 18 वर्षे मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. औषधे वेळेवर घेते.
व्यायाम किंवा योगाभ्यास ह्याकडे विशेष लक्ष दिले नाही. विशेष असे आहे की कितीही BP वाढलेले असले तरी ते मला समजतच नाही. सहज म्हणून चेक करायला गेले, तर किती आहे ते न सांगताच डॉक्टरांनी झाप झाप झापले. खूपच high झाले होते. सगळ्या टेस्ट करायला लावल्या. सुदैवाने बाकी काही प्रॉब्लेम निघाला नाही. पण डॉक्टरांनी वॉर्निंग दिली की औषधे दिली आहेत तितक्यावरच थांबली पाहिजेत.
त्यासाठी व्यायाम,योगासने,प्राणायाम नियमित करायलाच पाहिजे.
आणि योगासनाचा योग जुळून आला. इथे मराठी मैत्रिणींचे अनेक व्हाट्सअप्प ग्रुप आहेत. त्यातून मला माधवी मुळे हिचा संदर्भ मिळाला. मी तिला मेसेज केला. तिचेही लगेच उत्तर आले. मी रहाते ती एरिया तिला माहीत होती. ती लगेचच मला भेटायला आली. 15 जून ला माझा क्लास सुरू झाला.
आठ दिवसच होत आहेत मी प्राणायाम सुरू करून, मलाच माझ्यात खूप फरक जाणवतो आहे.
चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज आले आहे. आतून समाधान जाणवत आहे. चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या आहेत. BP नॉर्मल झाले आहे.
माधवी खूप शांतपणे, व्यवस्थित समजावून,परत परत सांगून नीट शिकवीत आहे.
आई दादा आणि धाकटी बहीण नीता,जी योग-शिक्षिका आहे, ह्यांच्याकडे वेळेवर लक्ष दिले नाही ह्याचे मला खूप वाईट वाटते आहे.
आज जागतिक योगदिवस आहे. प्राणायामाची जादू मी अनुभवते आहे. आजच्या दिवशी नियमित योगा करण्याचा मी संकल्प करते आणि सगळ्यांना आवाहनही करते.
#smitanubhav 45
Comments
Post a Comment