स्मितानुभव #44 माझी सायकल

काल एक गंमतच झाली, ती माझ्या स्वप्नात आली आणि सरळ भांडायलाच लागली.
" अग मी आधी आले ना तुझ्या आयुष्यात, मला डावलून तू तिच्यावर लिहिलेस, काना मागून आली आणि तिखट झाली!
खरं तर मीच तुला बॅलन्स शिकविला. रोड सेन्स शिकविला. अगदी बरोबर आहे तुझे. नाही जमलं आपलं तितकस, पण म्हणून इतका उपमर्द. नाही आवडलं मला. कधी कधी तू मैत्रिणीला डबल सीट घेऊन फिरत होतीस ना? खूप नाही पण पाच सहा वर्षे तरी होता ना आपला सहवास ! आणि नंतर पण मी तुझ्या लेकीच्या उपयोगी पडले ना ? इतकं सगळं विसरलीस?"

मंडळी लक्षात आले का ? माझी सायकल माझ्या स्वप्नात आली होती. विसरले खरी मी तिला.

दहावीत असताना माझ्या आजीने मला सायकल बक्षीस म्हणून दिली. काळी भोर ....हंबर कंपनीची
लेडीज सायकल! 🚲🚲
त्या आधी भाड्याने सायकल आणून धडपडून, आई वडिलांना पाठीमागे पळायला लावून,अनेकदा गुढघे फोडून घेऊन मी कशीबशी सायकल शिकले होते. वाटले सरावाने येईल नीट चालवायला.

खूप प्रयत्न करून सुद्धा मला सफाईदारपणे सायकल काही चालवायला आली नाही. एक तर ती मला खूप उंच होत होती. बसून पाय टेकायचे नाहीत आणि उतरायला लागायचे. मुळात जे धैर्य लागते तेच माझ्याकडे कमी होते. त्यामुळे सायकल हातात धरून चालताना, बरेच जणांनी मला पाहिलेले आहे. सायकलने गेल्यामुळे वेळ वाचतो हा कन्सेप्ट मला लागूच होत नव्हता. बी कॉमच्या शेवटच्या वर्षी मी क्लास लावला होता डेक्कनवर, तेव्हा मी जरा जास्त सायकल वापरली.
मंदारला शाळेत सोडायला पण कधी कधी सायकल वरून जात होते.
एक दिवस डेक्कनहून परत येत असताना मी दोन बसच्या मध्ये अडकले, झाले काहीच नाही पण मी खूप घाबरले. आईदादांनी खूप समजूत घातली की होते असे कधी कधी..... पण माझी विशेष काही प्रगती झाली नाही. नीता, माझी धाकटी बहीण मात्र तीच सायकल बिनधास्त चालवायची. ती आणि मी मिळून गॅस सिलेंडर सायकलवरून आणत असू.
बी कॉमची परीक्षा झाल्या झाल्या मी बँकेत रुजू झाले, लोणावळ्याला. तेव्हा शिवाजीनगर पर्यंत सायकलने जावे असे ठरवले होते. काहीना काही बहाणा करून मी बसनेच जात असे. नंतर लग्न करून चिंचवडलाच गेले. एकूण काय सायकलचे आणि माझे सूर काही जुळले नाहीत.

हे मात्र नक्की की सायकल येत असल्याने मी लुना लगेच चालवू शकले. सायकल बरोबरच जीवनाचा बॅलन्स पण शिकले.

तीच सायकल पुढे माझ्या लेकीनेही वापरली.
मुंबईला गेल्यावर गंजून खराब होऊ नये म्हणून
एका गरजू बाईला देऊन टाकली.
             🚲🚲🚲🚲🚲
#smitanubhav 44

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस