स्मितानुभव #43 स्नेहा हर्षद
हर्षद आणि स्नेहा जात्याच समजूतदार. जुळी असली तरी विशेष भांडणे किंवा मारामारी असे कधीच झाले नाही. त्यामुळे तू मोठा किंवा तू मोठी आहेस, समजून घे....असे सांगायची वेळ कधी आलीच नाही. आणलेले खेळ एकमेकांत वाटून घ्यायची आणि खेळायची. एकाला दोघे असल्यामुळे लहान असेपर्यंत बाहेरचे कोणी पण त्यांना लागायचे नाही.
तीन वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना नर्सरीत घातले. जुळी असल्याने दोघेही लहानशीच होती. हात धरून नीट जायची. स्नेहाला जात्याच नीटनेटके राहण्याची मॅचिंग बांगड्या, माळ अशी आवड होती. घरी सुद्धा व्यवस्थितच सगळे लागायचे. शाळा छोटी घरगुती होती. जास्त नियम नव्हते.
एक दिवशी ती सांगत आली की मार्टिनने माझ्या बांगडया ओढल्या,त्याला त्या हव्या होत्या. माझा हात दुखतोय आता. मी सहजच हर्षदला म्हटले की अरे तू होतास ना तिथे ? अश्या कश्या बांगडया ओढू दिल्यास? तू तुझ्या बहिणीकडे लक्ष द्यायला पाहिजेस ना? बस, मी विषय सोडून दिला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमचे घर शोधत एक लहान मुलगा आणि त्याची आई आली. ओळख नव्हतीच. तिने एकदम भांडणाचा सूर लावला. मी विचारले झाले तरी काय? ती म्हणाली " आपके बेटे ने मेरे बेटे को आज स्कुल में मारा हैं। बुलावो उसको।" खरं तर हर्षद काही मारामारी करण्यातला नाही. मला जरा आश्चर्यच वाटले. मी हर्षदला हाक मारली. त्याला पाहून त्या बाईचा चेहरा एकदम पडला. तिला वाटले होते की हर्षद मोठा आणि सशक्त मुलगा आहे आणि त्यामुळे तिच्या मुलाला खूप लागले असेल. तिन्ही मुलांची चण पाहून आम्ही दोघी हसायलाच लागलो. एक से एक लहानखुरी होती तिघेही. कॉफी घेऊन ती हसत हसत घरी गेली.
ती गेल्यावर मी हर्षदला विचारले "अरे का मारलेस तू त्याला?"
" अग आई तूच सांगितलेस ना स्नेहाकडे लक्ष द्यायला. हाच मार्टिन काल बांगड्या ओढलेला!
काल साठी मारले,ह्या पुढे लक्ष देईन."
(मनात बात खतम)
#smitanubhav 43
Comments
Post a Comment