स्मितानुभव #42 मी आणि माझी लुना
1985 साली मी लग्न झाल्यामुळे चिंचवडला राहायला गेले. वाहतूक व्यवस्थेची खूपच गंभीर स्थिती होती. बस वाहतूक अनियमित आणि रिक्षा ह्या मीटर शिवाय... हम करे सो कायदा......
थोडक्यात काय तर चालण्याशिवाय पर्याय नव्हता.
तेव्हा पगार पण बेतातचेच, नवीन नोकरी, नवीन संसार आणि श्री शिल्लक काही नाही त्यामुळे
एक दो एक दो...फारच दमलेले असेल तर रिक्षा
पण क्वचितच...
हे जवळजवळ 1991 पर्यंत असेच चालू होते. दोन पायाची गाडी......हळूहळू मुले पण मोठी झाली, त्यांचे पाळणाघरात द्यायचे, शाळेचे सामान वाढले. एकटीला सगळे उचलणे जमेना. सकाळच्या वेळी तर खूपच गडबड व्हायची. थोडे आर्थिक स्थैर्य पण आले होते आणि बँकेतून वाहनकर्ज पण मिळू शकणार होते म्हणून दोन चाकी गाडी घेऊ या असा विचार केला.
पैसे खर्च करायचे म्हणजे मला खूप टेन्शन यायचे, त्यामुळे कमीतकमी पैश्यात काय येईल ते मी निवडायची. यजमानांचा विरोध असताना सुद्धा मी लुना घेण्याचा हट्ट केला...साधा सोप्पा विचार पैसे कमी आणि गरज भागणार होती. शेवटी हो नाही हो नाही करता करता लुना मँगनम...जे लेटेस्ट मॉडेल होते ते घ्यायचे ठरविले आणि गुढीपाडव्याला लुना घरी आली.
थोडे दिवस ते अगदी गुणी बाळ होते आणि मग त्याचे रंग दाखविणे सुरू झाले. एका शनिवारी हाफ डे.. बँकेतून घरी जाताना किक मारली तर गाडी बरोबर हॉर्न पण सुरू झाला, काही केल्या थांबेना. तशीच घरी जायला निघाले. पोटात कावळे कोकलत होते आणि रस्त्याभर सगळे माझ्याकडे पाहत होते. एवढ्यात लक्षात आले की गाडीची शोरूम वाटेतच आहे. लगेच तिकडे वळले. मेकॅनिकने काहीतरी दुरुस्ती केली आणि आवाज थांबला.
आम्ही दोघे आणि दोन मुले असे त्यावरून फिरत होतो. आता तसे कोणी जाताना दिसले की लक्षात येते की किती मोठी रिस्क आम्ही घेत होतो ते, पण काही इलाज नव्हता. मुले ना उचलून घेण्याइतपत लहान होती ना सगळीकडे चालत जाण्यासारखी मोठी होती. ईश्वरीकृपा होती सारे काही नीट निभावले.
कधी सकाळी लगेच सुरू व्हायची कधी सुरूच व्हायची नाही. एव्हाना warranty संपली होती आणि शोरूम पण शिफ्ट झाली होती. बरेचसे
गँरेजवाले लुना बघूनच दुरुस्त करता येत नाही म्हणायचे. नशीब थोडे बलवत्तर होते म्हणून कोपऱ्यावरचा मेकॅनिक दुरुस्त करायचा,पण तो नियमित नव्हता. अगदी बेभरवशाचा.. गाडी बदलणे ही शक्य नव्हते.तसेच रेटत होतो.
जून 1993 ला माझी बदली चिखलीला झाली. चिंचवड पासून साधारण 10-12 किलोमीटर
....देहू आळंदी रोडवर ....खेडेगाव
नगरपालिकेच्या हद्दीत रस्ता चांगला होता. नंतर
जवळजवळ सात आठ किलोमीटर कच्चा होता.
त्या भागात सगळी भंगारची दुकाने होती.रस्त्यावर बारीक अणकुचीदार लोखंडाचे कण (बर )पडलेले असे, त्यामुळे खूप वेळा गाडी पंक्चर होत असे.
पंक्चर लुना ढकलणे म्हणजे एक दिव्यच! ज्याने ढकलली आहे तोच त्याचा त्रास जाणे.
असेच एकदा रस्त्याने जात असताना काहीतरी उडून बाजूच्या शेतात पडले. काय ते कळले नव्हते पण कसे कोणास ठाऊक, गाडी बाजूला उभी करून, शेतात उतरून मी ते घेऊन आले. बँकेत गेले, सामान ठेवले आणि मॅनेजरना सांगून बाजूच्या मेकॅनिककडे गेले. त्याला दाखवून मी म्हटले की हे बघा काहीतरी गाडीचे उडून पडले आहे.
तो माझ्याकडे बघतच बसला.
त्याने विचारले ,"मॅडम हे पडल्यानंतर किती दूर तुम्ही गाडी चालवून आणलीत?"
मी म्हटले,"असेल पाच सहा किलोमीटर, का हो?"
तो म्हणाला,"मॅडम तुम्ही आज खूप मोठया संकटातून वाचला आहात. ह्या स्क्रूमुळे सगळी गाडी जोडलेली असते. तोच पडला होता आणि तुम्ही गाडी चालवत आणलीत !" अज्ञानात सुख की देवाची कृपा ....बचावले खरी.
असेच रडत खडत सुरू होते. माझी पण चिडचिड होत होती. असेच एक दिवस दुरुस्तीला दिलेली लुना आणायला म्हणून यजमान गेले ते विकूनच घरी आले.
कितीही त्रास झाला तरी ती घरातील पहिली गाडी होती त्यामुळे पुढे बरेच दिवस वाईट वाटत होते. मग M80 ने तिची जागा घेतली. लुनाचा विसर पडला.....आणि आज 24 वर्षांनी तिची आठवण आली.
#smitanubhav 42
फोटो गुगल वरून
Comments
Post a Comment