स्मितानुभव#4 निरागसता

संध्याकाळचा स्वयंपाक करताना दोघेही माझ्या आसपास घोटाळायची. तो वेळ खास आमच्या तिघांचा असायचा. शाळेत काय झाले?एकमेकांच्या काय खोड्या काढल्या? घराचा अभ्यास काय आहे? ह्या सगळ्याची उजळणी व्हायची.
एक दिवस म्हणाली आज महात्मा जोतिबा फुले ह्यांचा धडा शिकविला.
आजूबाजूची परिस्थिती बघत असता मुली शाळेत जात नव्हत्या हे काही त्यांच्या बालबुद्धीला पटले नव्हते.
मी म्हटले अरे ही खूप जुनी गोष्ट आहे, त्यांनी शाळा सुरू केली म्हणून आज मुलीपण शाळेत जाऊ शकत आहेत. मुलांनी विचारले तू शाळेत गेली आहेस का? मी म्हटले हो, मी मोठ्या शाळेत ( कॉलेज) मध्ये पण गेले आहे आणि शिकले म्हणून तर बँकेत नोकरी करते आहे.
मुले " मग आजी शिकली आहे का?"
मी  " हो ती पण मोठ्या शाळे पर्यंत शिकली आहे"
मुले " तिची आई?"
मी  " ती शिकली आहे.तिला लिहिता वाचता येते पण ती शाळेत गेलेली नाही, घरीच आपल्या भावांकडून शिकली आहे. तिची आई(माझी पणजी)मात्र शाळेत पण गेली नाही आणि शिकली पण नाही. इतक्या पूर्वी शाळा नव्हत्या"
कितपत कळले ते माहीत नाही पण तो विषय तिथेच थांबला.
जवळ जवळ आठ पंधरा दिवसांनी रात्री जेवताना हर्षद म्हणाला " बरं झालं तू शाळेत गेलीस आणि शिकलीस."
त्यावर स्नेहा म्हणाली" नाहीतर आजोबा कुठे कुठे फिरले असते बाबांना शोधत!"

असा झाला बालबुद्धीचा प्रवास
(आम्ही दोघे एकाच बँकेत आहोत आणि तिथेच बंध जुळले)
#smitanubhav 4

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस