स्मितानुभव#3 सामाजिक जाणीव पुढील भाग

ह्या भागातील लोक खूप गरीबआणि अशिक्षित आहेत. आदिवासी नाहीत,पण जवळच्या खेड्यात राहतात. नात्यातच विवाह करतात,त्यामुळे त्यांच्या समाजात अपंग मुले जास्त आहेत. एकाच मुलात अनेक कमतरता आहेत. ही शाळा सरकारी आहे. वसतिगृह आणि शाळा असे एकाच इमारतीत आहे.
राणी मुखर्जीच्या "ब्लॅक "सिनेमात जशी ती दाखविली आहे, तशी इथे अनेक लहान मुले आहेत. एक सात आठ वर्षाचा मुलगा, आंधळा, मुका, बहिरा आणि शारीरिक अपंग होता. त्याला बघणाऱ्या ताईंनी कौतुकाने सांगितले की तो मुलगा आता आपापली शर्टची बटणे लावू शकतो. केवळ वयाने मोठी म्हणून मी माझे रडू आवरले होते. ते सगळे बघून, तिथला स्टाफ ,त्यांचे त्या मुलांशी असलेले ममत्वाचे नाते बघून आम्ही थक्क झालो. खूप गलबलून आले होते.
दरवर्षी शाळा सुरू होण्याआधी येथील शिक्षक आजूबाजूच्या खेड्यात जाऊन मुले शोधून शाळेत दाखल करून घेतात. शाळेतील अभ्यासक्रम पण वेगळा आहे.
हे सगळे पाहून आम्ही अवाकच झालो होतो. चौघांनी एकदमच म्हटले आपण ह्या शाळेला आई आजीच्या नावे देणगी देऊ. माझी मावशी आणि तिचे यजमान ह्यांचे ह्या भागात शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. आम्ही त्यांना आमचा विचार बोलून दाखविला. ते आम्हाला मुख्याध्यापक गुरुजींकडे घेऊन गेले. सर म्हणाले आम्हाला रोख रक्कम नको, सरकार कडून आम्हाला अनुदान मिळते. परंतु ते खर्च करण्यासाठी आम्हाला बंधने आहेत. तुम्ही इतर काही गरजेच्या वस्तू दिल्यात तर जास्त चांगले होईल. ही मुले इतक्या गरीब घरातील आहेत की रोजच्या गरजेच्या वस्तू सुद्धा त्याचे आईवडील पुरवू शकत नाहीत. खरं सांगायचे तर आम्ही सुन्न झालो होतो. आम्ही आमच्या परीने त्या मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुलांबरोबर फोटो काढले,मावशीने नेलेला खाऊ दिला आणि परत आलो. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.
आम्ही सहजच गेलो असल्यामुळे जास्त पैसे बरोबर नव्हते, त्यावेळी इतरही काही सुविधा नव्हत्या, म्हणून मुंबई ला परत गेल्यावर वस्तू पाठवायचे ठरले. पण टोकन म्हणून चित्रकलेच्या वह्या ,खडू आणि  खाऊ घेऊन दुसरे दिवशी परत जाऊन देऊन आलो. वस्तू देऊन निरागस आनंद बरोबर घेऊन आलो.
मुंबईहून आम्ही 40 बेडशीट्स पाठविली. मावशीने छोटा कार्यक्रम करून,गावातील प्रतिष्ठित लोकांना बोलावून, आई आजीचे  नाव घेऊन ती मुलांना दिली. बासुंदी पुरीचे जेवण दिले. हे पाहून उपस्थित पाहुण्यातील कोणीतरी गाद्या देण्याचे आश्वासन दिले. आज देणगीदार म्हणून आई आजीचे कुठेल्याही भिंतीवर किंवा मासिकात नाव नाही ,
पण एक बीज पेरले गेले. मुख्याध्यापक सरांनी आम्हाला धन्यवाद देण्यासाठी जे पत्र पाठविले त्यात त्यांनी नमूद केले की मदतीचा ओघ वाढला आहे.
बऱ्याच वेळा असे होते की इच्छा असते पण मार्ग दिसत नाही. असं म्हणतात उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला समजू नये पण मुद्दाम आज लिहिले ...

Comments

Popular posts from this blog

आठवते बालपण

दार उघड माई !

छोटीसी आशा !