स्मितानुभव#39 निरागसता मुले आणि पैसे


भावंडात मी सगळ्यात मोठी. घरात नोकरी करणारी पण मीच पहिली. सगळ्यांनाच त्याचे कौतुक होते. मला सुध्दा काहीतरी विशेष वाटत होते. त्यामुळे पहिल्या पगाराचे पण खूप कुतूहल होते. अर्थात बँकेत असल्यामुळे तो खात्यात जमा झाला. पण स्वकष्टाच्या पैशाचे खूप अप्रूप वाटले.  घरातल्या सगळ्यांनाच काही ना काही घ्यावे असे वाटले आणि काहीतरी घेतले सुद्धा. आईसाठी साडी घेतलेली लक्षात आहे पण बाकी आठवत नाही.
माझा धाकटा भाऊ मंदार तेव्हा 7 वर्षांचा होता. त्याला विचारले की मी तुला काय देऊ? माझ्या पहिल्या पगारातून? मी असं विचारल्यावर तो खूप खूष झाला आणि म्हणाला " मला ती लाल कापडातील कुल्फी घेऊन देशील का? तो घंटी वाजवत येतो त्याच्याकडून!" मी डोक्यालाच हात लावला. तेव्हा असे बाहेरचे पदार्थ आई दादा घेऊन देत नसत, त्यामुळे त्याला त्याची फार उत्सुकता वाटत होती. मी त्याला म्हटले "अरे इतकेच काय मागतोस? काहीतरी मोठे माग ना?"
तर निरागसतेने तो म्हणाला," बरं मग दोन कुल्फी घेऊन दे."🤣🤣

माझी मुलगी स्नेहा अगदी दोन अडीच वर्षांची असतानाची गोष्ट. तिला चप्पल घ्यायच्या होत्या. त्यासाठी तिचे बाबा तिला घेऊन गेले. बराच वेळाने घरी आले. स्नेहाने खुशीत येऊन चप्पल दाखविल्या.
उंच टाचांच्या,जरा फॅशनेबल,भारी चप्पल घेऊन आली होती. 👠👠
आधी इतक्या लहान मुलीला उंच टाचांच्या चप्पल आणलेल्या बघून मला राग आला. किंमत पण जास्त असणार असा अंदाज आला. केव्हढ्याला विचारले तर यजमान म्हणाले 100 रुपये!
87/88 साली दोन वर्षांच्या मुलीच्या चप्पलेसाठी ही रक्कम फारच होती. नकळतच माझा आवाज चढला. त्यावर यजमान म्हणाले की काय करणार?हिला ह्याच आवडल्या! तिला नाराज कसे करणार म्हणून घेऊन आलो. आईला राग आलाय हे तिच्या लक्षात आले. काय बोलतो आहे ते तिला तितकेसे कळले नव्हते. माझ्याकडे पाहून स्नेहा पट्कन म्हणाली " किती बोलतेस माझ्या बाबांना फार काही नाही एकच नोट दिली आहे त्यांनी."

# smitanubhav 39

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस