स्मितानुभव #38 कलाकार
आमच्या लहानपणी लाईव्ह इन कॉन्सर्ट वगैरे काही भानगड नव्हती. सार्वजनिक गणपतीत किंवा शाळेच्या, संस्थेच्या मदतीसाठी मोठे मोठे कलाकार कार्यक्रम करत असत. जमा रक्कम देणगी म्हणून दिली जात असे.
आदरणीय बाबूजींचे गीत रामायण शिवाजी मंदिरात ऐकल्याचे अंधुक आठवते. त्यांची महती कळण्याचे तेव्हा वय नव्हते आणि त्यांच्या बद्दल काही बोलण्याची पात्रता माझ्यात नाही. पण त्यांचे ते स्वर्गीय गायन मेंदूत कुठे तरी नोंदले गेले होते. कळायला लागल्यावर मी सर्व गाणी मनापासून ऐकली, अजूनही ऐकते आणि मनोमन ग दि मा आणि बाबूजींना सलाम करते.
शाळेच्या मदतीसाठी आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची " राजा शिवछत्रपती " ही व्याख्याने ठेवली होती. त्यांची व्याख्यान देणारी मूर्ती,त्यांची तडफ, वक्तृत्व हे आजही स्मरणात आहे. हे सगळे अत्युत्तम आणि सर्वश्रुतच आहे.
मला भावलेली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः, त्यांच्याच व्याख्यानाचा पास काढला होता आणि प्रवेशद्वारावर दाखवूनच आत येत होते कारण कार्यक्रम शाळेच्या मदतीसाठी होता. हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. शिवाजी महाराज त्यांच्या रोमारोमात भिनलेले असल्याचेच हे लक्षण नाही का? बालवयात बघितलेली ही घटना आजही माझ्या स्मरणात आहे.
2005 किंवा 2006 मध्ये माननीय आशा भोसले
यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टला जाण्याचा योग आला. आयोजकांची काही अडचण झाल्यामुळे
कार्यक्रमाचे ठिकाण आयत्यावेळी बदलावे लागले.
त्यामुळे सगळीकडे गोंधळ होता. आसन व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती. आम्ही पण नाराज झालो होतो. आशाताई दिसणे तर दूरच, गाणी तरी ऐकू येतील की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. कसेबसे सभागृहात शिरलो. आमचे दैव बलवत्तर होते. मधली आणि बऱ्यापैकी पुढची जागा आम्हाला मिळाली.
आशाताईं स्टेजवर आल्या आणि संपूर्ण सभागृह उत्साहाने भरून गेले. त्यावेळी त्यांचे वय 72/73 होते. वयाचा आणि उत्साहाचा काहीही संबंध नाही हे त्यांनी त्या दिवशी दाखवून दिले.
झाल्या प्रकाराबद्दलची कोणताही नाराजी त्यांनी दाखविली नाही. आधी त्या काळा चष्मा घालून स्टेजवर आल्या,पण श्रोत्यांशी एकरूपता साधता येत नाही म्हणून गॉगल काढून टाकला आणि बिनधास्तपणे सांगितले की नातवाशी मस्ती करताना लागले आहे, डोळा सुजलेला आहे. तीन साडेतीन तासाच्या कालावधीत त्यांनी तीन चार वेळा कपडे,दागिने बदलले. कोळीगीत सादर करताना कोळीणी सारखी ओढणी घेतली,नथनी घातली. भरपूर गाणी म्हटली. कोजगिरी पौर्णिमे-
निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता.
आशाताईंच्या कार्यक्रमानंतर ही आणखी काही कार्यक्रम होते, पण मन त्या माहोल मधून बाहेर आलेच नाही आणि त्या स्वरानंदातच आम्ही घरी आलो.
कलाकार हा रसिकांच्या गळ्यातला ताईत का असतात त्याचा हा प्रत्यक्ष अनुभवच नाही का?
# smitanubhav 38
Comments
Post a Comment