स्मितानुभव#37 स्वसंरक्षण-स्त्री

काल परवाच एक बातमी वाचनात आली की बेंगलोरला रात्रीच्यावेळी एअरपोर्टला जाताना टॅक्सी ड्रायव्हर वाईट वागला. मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिला तिचे फोटो काढू देण्यास भाग पाडले.
स्त्री पुरुष समानता आणि समांतर विषयात मला पडायचे नाही. हे वाचत असताना 2013 मध्ये "Woman's Day" Celebration साठी Syndicate Bank  मध्ये आलेल्या एका विदुषींचे भाषण आठवले.

कसे ते माहीत नाही, पण मी त्यांचे नाव, हुद्दा सगळे विसरले आहे. ह्या गोष्टींची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा मला ह्याची फार खंत वाटते. त्या RBI मध्ये उच्च पदस्थ होत्या इतकेच लक्षात आहे माझ्या. त्यांचे भाषण इतके सुंदर होते की रेकॉर्ड करून शाळेत,कॉलेज,ऑफिस, सोशल मिडिया सगळीकडे प्रसारित करायला हवे असे नंतर वाटले.

तेव्हा नुकतीच दिल्लीत " निर्भया "केस झाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी बोलायला सुरुवात केली. झालेली गोष्ट वाईटच आहे,असे व्हायलाच नाही पाहिजे परंतु ह्याचा दुसऱ्या बाजूने कोणी विचार करत नाही ह्याचे वाईट वाटते. मुळात अशी परिस्थिती निर्माणच होऊ नये असा प्रयत्न स्त्री ने केला पाहिजे.
स्त्री ने स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. जरी पुरुष बरोबर असेल तरी तो एकटा काय करू शकणार? रात्री बेरात्री फिरणे हे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. कुठलाही ग्रुप बघितला तर एक मुलगी आणि बरीच मुले किंवा उलटे एक मुलगा आणि अनेक मुली! खरंच आवश्यक आहे का हे?

शक्यतो मुलीने एकटे कुठेही जाण्याऐवजी चार सहा जणींचा  ग्रुप करून जावे. हल्ली शेजारी कोण राहते, ते काय करतात किंवा त्यांचा फोन नंबर इतकी सुद्धा प्राथमिक माहिती नसते. कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणायचे, स्पेस द्यायची म्हणायचे आणि विचारपूस सुद्धा करायची नाही ही आपली संस्कृती आहे का? आपल्या सहकर्मचाऱ्याबद्दल सुद्धा आपल्याला पुरेशी माहिती नसते. जेव्हा असे एकट्याने  जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते चार जणांना सांगावे. काहीतरी मार्ग निघतोच. हे मुलगा असो व मुलगी दोघांनाही करणे जरुरी आहे.

काही वाईट प्रसंग घडला की स्त्रीच्या वेशभूषेवर घसरतात. ज्या कपड्यात ती मोकळेपणाने वावरू शकते, आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकते असे कपडे घातले तर त्यात वावगे काय आहे? आज 21व्या शतकात इतकेही स्वातंत्र्य तिला असू नये का ? त्याच बरोबर स्त्रियांनीही आपण ज्या समाजात वावरतो त्यानुसार आपला पोशाख आणि वागणे ठेवले तर नक्कीच परिस्थितीत बदल होऊ शकतो.

हे आठवूनच मला असे वाटले की
बेंगलोर प्रसंग सुद्धा सहज टाळण्यासारखा नव्हता का? एक तर अशी मध्यरात्रीची flight बुकच करायची नाही, किंवा मग आधीच एअरपोर्टवर जाऊन थांबायचे. पश्चाताप करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे चांगले नाही का?

दोन दिवस झाले, मी त्यांच्याच शब्दात त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे.....पण मला ते जमत नाही आहे. विचार त्यांचेच आहेत परंतु ते मला पटले आहेत म्हणून ते मी माझ्या शब्दात मांडले आहेत. त्यांच्या भाषणातील आणखी एक मुद्दा मला आवडला. तो पण आवर्जून नमूद करावासा वाटला.

त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलाविले होते, त्यांनी तो नम्रपणे स्वीकारला पण सांगितले की मला सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या, माझ्या आईवडीलांनी माझा आवाका ओळखून मला संधी दिली आणि सासरच्यानी पाठींबा दिला म्हणून मी आज ह्या हुद्यावर आहे. पुढच्या वर्षी अश्या "स्त्री" बोलवा की जी परिस्थितीशी झगडून
स्वकर्तृत्ववावर खंबीरपणे उभी आहे. तिला हुद्दा नसला तरी चालेल, पुढे हसून म्हणाल्या पाहिजेतर अश्या स्त्रीचा सत्कार करायला मला बोलवा. मला आवडेल यायला.

# smitanubhav 37

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस