स्मितानुभव #36 भेळ
पुणे सोडून आता खूप वर्ष झाली, तरी ती ओढ अजून कायम आहे. मी पायी फिरलेले पुणे मला पुरेपूर आठवते, विशेषतः "भेळ आणि पाणीपुरीची ठिकाणं " एकदम चटपटीत कोपरा आहे तो माझ्या मनातला😋😋
एव्हढे जग फिरून झाले, पण पुण्यातील भेळेची चव कुठेच नाही! हल्ली तर मी भेळ एकतर स्वतः घरी केलेली खाते किंवा मग पुण्याला गेल्यावरच.
आधी लहान होतो तेव्हा आई घरीच भेळ करायची किंवा मग कधी सारसबागेत गेलो तर तिथे खाणं व्हायचे,पण ते प्रमाण फारच कमी होते. पाणीपुरी तरी खाताच येत नव्हती. एकतर तोंडात मावायची नाही आणि खाताना ठसका लागायचा.
खरी लज्जत समजली ती कॉलेजमध्ये गेल्यावरच, एकतर थोडा पॉकेटमनी मिळू लागला होता आणि मैत्रिणींबरोबर फिरायला सुरवात झाली होती.
आमचा पाचजणीचा ग्रुप, सगळ्याभेळ प्रेमी.
जोनाने तर सांगितले होते की तिला भेळेचेच केळवण आवडेल, मग काय मस्तपैकी गच्चीवर कार्यक्रम केला. जोनामुळे बरेच नवीन स्पॉट कळले आम्हाला.
छान छान चवीच्या भेळेचे स्पॉट आम्ही शोधून काढत होतो. प्रत्येक ठिकाणची चव वेगळी आणि काहीतरी स्पेशालिटी. कुठे उकडलेला बटाटा घालतात, तर कुठे बारीक चिरलेली कैरी.
कल्पना भेळ...टिळक रोडवर आम्ही त्याला दाढी- वाल्याची भेळ म्हणायचो. नाकातोंडातून पाणी येईल इतकी तिखट असायची.
सरस्वती कट्टा.... बाजीराव रोडवर इकडे सहसा आम्ही घरातलेच जायचो. इथे एकजणच काम करतो, सगळे व्यवस्थित सांभाळतो. चव वर्षानुवर्षे तीच आहे. आता ह्या गणपतीत खाल्ली तिथली भेळ. अगदी मनापासून दाद दिली काकांना. इतके खूष झाले की हिशोबच चुकले. इथली पाणीपुरी पण एकदम भारी...सहा सात पुऱ्या एकदम भरून देतात पण शेवटची पुरी सुद्धा मस्त कुरकुरीत असते.
पुष्करणी भेळ कुमठेकर रोडवर... इथे भेळेसाठी कोल्हापुरी चरमुरे वापरतात, त्यामुळे ओली असून सुद्धा खूप वेळ चुरमुऱ्याचा कुरकुरीतपणा शेवटच्या घासापर्यंत टिकून राहतो. इथे ही तेच.. फक्त काका आजोबा झाले आहेत, बाकी सगळे तसेच 30 वर्षांपूर्वीचे.
नवरत्न भेळ,स्वाद भेळ,सारस बाग, संभाजी बाग, आणि नंतर आता महाराणा प्रताप उद्यान कुठलेही ठिकाण मी सोडलेले नाही.
लोणावळ्याला असताना आम्ही बँकेतील लोकांनी " Saturday Club " सुरू केला होता, म्हणजे काय की डबा न्यायचा नाही आणि भेळ,पाणीपुरी,रगडा पॅटिस खायचे. कधी कधी शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर भेळ खायची. ह्याशिवाय घरी भेळेचे प्रोग्रॅम व्हायचे ते वेगळेच.
घरी नेहमी कोरडी भेळ असायचीच.
हर्षद स्नेहा लहान असताना शनिवारी हाफ-डेचा
फायदा घेऊन चिंचवडला श्रीधरनगरच्या बागेत जायचो. तिथे तेव्हा एकच भेळेची गाडी होती,पण तिथली भेळ मस्त असायची. मुलांना काहीतरी घरी केलेले देऊन मी आणि माझा नवरा आळीपाळीने भेळ खाऊन यायचो,( ह्या बद्दल मुले अजूनही नाराज आहेत आमच्यावर). मुलांनीही वारसा पुढे चालविला आहे. मी बनवलेली भेळ सासरी सुद्धा सगळ्यांना आवडते " स्मिता भेळवाली " असे माझे टोपण नाव आहे. मी तिकडे गेल्यावर स्पेशल भेळ प्रोग्रॅम असतो.
मी पुण्यात आले आणि भेळ झाली नाही असे होतच नाही कधी घरी करतो किंवा मग बाहेर,पण भेळ पाहिजेच. (तसे सारेच भेळ प्रेमी... ताईचे निमित्त)
पुरणपोळीचे जेवण झालेले असतानाही सुनबाई
माझ्यासाठी भेळ घेऊन आली आणि मी मनसोक्त आस्वाद घेतला. 😋😋
#स्मितानुभव 36
ता.क: लेखासोबत share करायला घरी केलेल्या भेळेचा फोटो मिळाला नाही. म्हणून चिरंजीवांनी सूचना केली की आज भेळ कर आणि फोटो काढ.
Comments
Post a Comment