स्मितानुभव #35 वीणा तिखे

फेसबुक शाप की वरदान....

घाबरू नका मी काही निबंधाचा विषय देत नाही आहे. सहजच मनात आले की खरचं आधी किती कठीण होते कोणाशी संपर्क साधणे. त्यातून मुलींची तर नाव, आडनाव आणि कधी कधी तर गाव आणि देश सुद्धा बदलतो.

बऱ्याचदा मुलींच्या दोन नावे लावण्यावरून चेष्टेवजा चर्चा सुद्धा होते. मी सुद्धा आधी " स्मिता बर्वे "असेच नाव लावत होते, कारण गेले 33 वर्ष माझी तीच ओळख आहे. एक दिवस मी माझे नाव बदलले" स्मिता बेहेरे-बर्वे " केले. पण भाऊ म्हणाला आता तुला कोणीही ओळखत नसेल बेहेरे म्हणून! मनात मलाही ते पटले, म्हणून मी नाव "स्मिता बर्वे-बेहेरे "केले. मनात कुठेतरी शाळेतील मैत्रिणीना भेटायची ओढ होती. झालेही तसेच
खूपजणी संपर्कात आल्या.

आणि एकेदिवशी मला फेसबुक मेसेंजरवर
"Hi Smita,I hope you are the same Smita from Renuka Swaroop.I am Veena Tikhe (now Karkare ) Got invite for school program so was feeling nostalgic.But I never forgot our school days especially your dabba- Bhakari and Loni. pl reply if you are the same person else ignore."

क्षणात काळाच्या सगळ्या भिंती गळून पडल्या आणि मी पाचवीत गेले, जवळजवळ 43 वर्ष मागे.
मी आणि वीणा पाचवी ते सातवी एका वर्गात होतो आणि दोघीही वर्गप्रमुख होतो. आठवीत विषयानुसार वर्ग झाले आणि आम्ही वेगवेगळ्या तुकडीत गेलो. हळूहळू संपर्क कमी होत तुटला. तेव्हा मोबाईल वैगेरे दूरच, landline पण नव्हते घरोघरी. पण तेव्हाचे बंध इतके मजबूत होते की जणू मध्ये काही काळ गेलाच नाही असेच आम्हाला वाटले.

न राहवून मी तिला फेसबुक कॉल केला आणि पोटभर बोललो. माझ्या विस्मृतीत गेलेल्या किती तरी गोष्टी तिने मला सांगितल्या. तिच्या संपर्कात असलेल्या बाकीच्या मैत्रिणींचे संदर्भ मिळाले.
किती निर्मळ मैत्री होती ती. मिळून डबा खायचा, वर्ग सांभाळायचा, कधी भांडण नाही की स्पर्धा नाही. वीणा सांगत होती की माझ्या डब्यातले सगळे लोणी तिला देऊन टाकत होते. मी हे विसरले आणि वीणाच्या तेच लक्षात आहे, किती निर्व्याज प्रेम हे!
काळाच्या ओघात,संसारात,नोकरीत हे सोनेरी क्षण
हरवले होते. वीणाच्या एका मेसेजने सगळ्या आठवणी पुनः जाग्या झाल्या.
वीणा दुबईत असते आणि मी भारतात. अजून आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही. बघू तो योग कधी येतो ते.
मागच्या वर्षी तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले, आम्ही प्रत्यक्ष न भेटताही आम्ही एकमेकींबरोबर
होतो. व्हाट्सअप्पवर एकमेकींना मेसेज करतो, सवडीनुसार गप्पा मारतो.
थोडक्यात असलेली मैत्रीची बीजे फेसबुकमुळे
पुन्हा जोमाने वाढू लागली आहेत.👭

# smitanubhav 35

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस