स्मितानुभव #34 नीताचा अपघात
आज मी जो अनुभव सांगणार आहे तो स्मित-अनुभव नाही आहे, पण आज इतक्या वर्षांनी त्याच्याकडे पाहताना तो एक रेशमी अनुभूती देतो.
आम्ही चार भावंडं, तीन बहिणी आणि एक भाऊ. माझ्यात आणि भावात 12 वर्ष अंतर आहे.
फेब्रुवारी 1978 ची गोष्ट आहे.
माझी आजी- मोठीआई वृद्धपकाळाने आजारी होती आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. सगळी मोठी माणसे त्या गडबडीत होती. आम्हा लहान मुलांचा नित्यक्रम व्यवस्थित सुरू होता.
एके दिवशी मी आणि नीता मंदारला घेऊन गीताला बालक मंदिरातून आणायला निघालो होतो. मंदार नीताच्या कडेवर होता आणि मी तिचा हात धरलेला होता. घरापासून आम्ही जेमतेम 500 मीटर पुढे गेलो असू , नीताला एका सायकलवाल्याने धडक दिली. तिच्या हातून मंदार खाली रस्त्यावर पडला. तो जेमतेम एक वर्षाचा होता. नीताला सुद्धा खूप लागले होते. मी पटकन मंदारला उचलले आणि नीताला हात दिला.
ती म्हणत होती की ताई मंदारला बघ. मंदार माझ्याकडे सुरक्षित होता त्यामुळे माझे लक्ष नीताच्या जखमेकडे होते. सायकलच्या चेन कव्हरने तिचा पाय गुडघ्याच्या वर चिरल्या सारखा फाटला होता आणि आतले हाड दिसत होते. आमची नीता जात्याच जास्त सहनशील, ती रडत नव्हती आणि तिला लागलेले पाहून मला रडू येत होते.
कशीबशी रडत, धावत मी मंदारला घेऊन घरी सांगायला पळाले. रडत असल्याने मला बोलता सुध्दा येत नव्हते. इतक्यात बाकीची माणसे नीताला घेऊन आली. नीताला थोडेसे लागलेले पण चटकन बरे होत नसे, इतके लागलेले कसे बरे होणार ह्या कल्पनेने आईला रडू फुटले. दादांनी लगेचच तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणाले की टाके घालावे लागतील. जखम इतकी मोठी होती की इंजेक्शनने सुद्धा तिचा पाय बधीर झाला नाही, तसेच टाके घातले डॉक्टरांनी.🤦
घरी आल्यावर आई म्हणाली, "मी मनात ठरवले होते की मोठीआई शेजारीच नीताचा बेड घालायचा म्हणजे दोघींचेही नीट करता येईल."
सुदैवाने तसे काही करावे लागले नाही त्यामानाने नीता लवकर बरी झाली. अजूनही तिच्या पायावर लागल्याची खूण आहे.
आज ह्या घटनेकडे बघताना वाटते की लेकीला लागलेले पाहून आईने तिची जबाबदारी टाळली नाही तर दोघींचेही करायची तयारी केली. कठीण परीस्थितसुद्धा संयम राखून निर्णय घेतला. मंदार रस्त्यावर पडला म्हणून नीताला त्याची काळजी वाटत होती आणि तो माझ्याकडे सुखरूप होता म्हणून मला नीताची काळजी वाटत होती.
आयुष्यातील धडेच आहेत की हे!
आजही आम्ही भावंडे अशीच रेशीम धाग्यात बांधलेली आहोत, एकाला लागले की वेदना बाकी तिघांना होते आणि छोट्यातला छोटा आनंदही सगळ्या कुटुंबाचा असतो.😊
#smitanubhav 34
Comments
Post a Comment