स्मितानुभव #33 लोणावळा लोकल
तशी मी कोषातच वाढलेली. माझी एरिया ठरलेली.
घर शुक्रवार पेठेत, शाळा रेणुका स्वरूप आणि कॉलेज स प महाविद्यालय सदाशिव पेठेत. मैत्रिणी पण इथल्याच. शुक्रवार ते सदाशिव ह्यांतच माझे सगळे विश्व. अगदी दूर म्हणजे पर्वती आणि इकडे शनिवारवाडा बस.
त्यामुळे लोणावळा शाखेत रुजू होणे म्हणजे माझ्यासाठी सीमोल्लंघनच होते.
त्यातून वय लहान, कॉलेज नुकतेच संपलेले,
जेमतेम साडे एकोणीस वर्षांची होते मी. पहिल्या दिवशी तर दादा ( वडील ) सोडायला आले होते लोणावळ्याला. सकाळी पुणे लोणावळा लोकलने जायचे आणि परत येताना सिंहगड एक्सप्रेस.
सिंहगड चुकली तर सहा वाजताची पुणे लोकल.
पहिल्या दिवशी दादांनी प्लॅटफॉर्म No, कुठे गाडी येईल, लोकल कुठून सुटेल ते सगळे दाखविले होते.
पण मनात धाकधूक होतीच, चेहऱ्यावर मी काही दाखविले नाही आणि दादांना निर्धास्त जा असे सांगितले. त्यांनाही काळजी वाटतच होती. त्यांनी पण विश्वास ठेवला आणि ते परत पुण्याला गेले.
मी विचार केला बँकेत कोणीतरी स्टाफ असेल तिच्याबरोबर आपण परत जाऊ. पण बँकेत मी एकटीच लेडीज होते. धीर करून रेल्वे स्टेशनवर आले, अजिबात गर्दी नव्हती, मनात खूष झाले मग
कळले की सिंहगड गेली आहे. मग धावत लोकलच्या प्लॅटफॉर्मवर गेले आणि लेडीज डब्यात चढले. हुष्य झाले.....परत डोक्यात आले की लोकल उलट्या दिशेला जाणारी तर नसेल....
हा प्रश्न पुढे कितीतरी दिवस कामशेत स्टेशन येई पर्यंत मनात घोळत असे.
हळूहळू सगळ्याची सवय झाली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मैत्रिणी भेटल्या. बँकेत पण सीमा नावाची मैत्रीण रुजू झाली. प्रवासाची भीड चेपली आणि त्याचा आनंद लुटायला सुरुवात झाली.
अचानक एक दिवस लक्षात आले आमच्यापैकी काही मुली शिवजीनगरला, सिंहगड मधून उतरून फार लवकर बसस्टॉपवर येतात आणि त्यांना लगेच बस मिळते आणि मला त्या नंतरची !
त्यांच्याशी बोलताना कळले की उलट्या दिशेने रुळावर उतरतात आणि उभ्या असलेल्या लोकल मध्ये चढुन ती पार करून प्लॅटफॉर्मवर उतरतात. त्यामुळे त्यांना पहिली बस मिळते. त्यांचा जिना चढा उतरायचा वेळ वाचायचा. मी पण फारसा विचार न करता त्यांच्या बरोबर जायचे ठरविले आणि मला सुद्धा पहिली बस मिळाली. जाम खूष झाले मी.10 मिनिटे लवकर आलेले पाहून आई दादा पण खूष झाले. आनंदात मी पण माझा पराक्रम सांगितला. मी माझ्याच नादात होते दोघांचाही गंभीर चेहरा माझ्या लक्षातच आला नाही.
रात्री जेवण झाल्यावर दादांनी मला हाक मारली. आई पण बाजूला बसली होती. माझ्या काही लक्षात आले नाही.
दादा म्हणाले, "तू आज काय केले आहेस ते तुझ्या लक्षात आले आहे का?"
मी माझ्याच धुंदीत,"आधीची बस मिळाली आणि मी दहा पंधरा मिनिटे लवकर आले."
दादा म्हणाले, "आज तू दोन चुकीच्या गोष्टी केल्या आहेस. नियम मोडून तू रेल्वे लाईन क्रॉस केलीस आणि दहा मिनिटे वाचविण्यासाठी किती मोठी रिस्क घेतली आहेस? काहीही होऊ शकते. गडबडीत उतरताना तू पडू शकतेस, तुझा हात पाय मोडू शकतो ज्याने तुला आयुष्यभर त्रास होऊ शकतो. ज्या लोकल मधून प्लॅटफॉर्म वर उतरलीस ती लोकल चालू झाली असती तर तू काय करणार होतीस? तुझे मेंढ्यांसारखे झाले नाही का? त्या मुली चुकीचे वागत असताना त्यांना तसे करण्यापासून अडविण्याऐवजी तूच त्यांच्या मागे गेलीस?"
मी फार भाग्यवान आहे. मोठीआई ,अप्पा,आई दादा ह्यांच्या वागण्यातून बोलण्यातून मुद्दाम न शिकविताही मला खूप शिकायला मिळाले. त्यामुळे आईदादा काय म्हणतात ते मला लगेच कळले. माझी चूक माझ्या लक्षात आली.
आजही आई दादांची शिकवण पावलोपावली माझ्या उपयोगी पडते.हा प्रसंग तर कायमचा मनावर कोरला गेला आहे.
🙏🙏🙏🙏🙏
#smitanubhav 33
Comments
Post a Comment