स्मितानुभव #32  पेन

पेन....लेखणी

पेन हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.
माझ्या लहानपणी पहिली दुसरीत पाटी पेन्सिलच असायची. तेव्हा मोठ्या माणसांच्या हातातले पेन पाहून लिहून बघायची खूप उत्सुकता वाटायची. अक्षर खराब होईल म्हणून तेव्हा पेन द्यायचे नाहीत.

तिसरीत असतांना बोरू आणि शाई हातात आली. सुलेखन पुस्ती लिहायला सुरुवात झाली. सुवाच्य अक्षराचा पाया भावे स्कुल मध्ये घातला गेला. बोरू काही विशेष आवडला नाही, त्याने काही नीट लिहिले जात नव्हते. तिसरीची वार्षिक परीक्षा संपली आणि फाउंटन पेन हाती आले.🖋

मग सराव म्हणून सुट्टीतच फाउंटन पेनने लिहायला सुरुवात झाली. तो ड्रॉपर, दौत, टीप कागद अश्या नवीन गोष्टी हाताळायला सुरुवात झाली. खूप मज्जा यायची. शाई संपली नसली तरी संपली म्हणायचे आणि दौत घ्यायची पेन मधली शाई त्यात ओतायची, ड्रॉपरने पुन्हा भरायची आणि पेन उलटे करून नीब मधून एक एक थेंब पुन्हा दौतीत टाकायचा. अभ्यासाची टाळाटाळ करण्याचा तो एक राज मार्ग होता. शाईची मोठी बाटली आणायची आणि छोट्या बाटलीत त्यातील काढून ठेवायची. आधी हे काम आई वडिलांना सांगावे लागे, मग हळूहळू जमू लागले.

शाळेत बाकीच्या मुलांकडे वेगवेगळी पेन्स असायची. कुणाचे पूर्ण पारदर्शक, तर कुणाचे अर्ध पारदर्शक, किंवा कुणाच्या पेनच्या मधल्या भागात थोडे पारदर्शक, काही पेन्स मधून तर शाई किती आहे ते दिसायचेच नाही. वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी पेन्स! मला तर माझे सोडून इतर सगळी पेन भारी वाटायची.

हळूहळू सगळ्या तऱ्हेची पेन वापरून झाली. सरावाने लक्षात आले की पेन नुसते दिसायला चांगले असून उपयोग नाही, त्याचे नीब चांगले पाहिजे. मग त्या दृष्टीने निरीक्षण सुरू झाले आणि मनात भरले ते camlin चे पेन. एक तर सहज मिळायचे आणि नीब पण छान असायचे. हस्ताक्षर खूप छान यायचे.पेन पडून नीब तुटू नये म्हणून मी खूप काळजी घ्यायची.✒
तेव्हा काही बॉलपॉइंट पेन चे फॅड नव्हते, चुकून कोणाकडे दिसले तर बघावे वाटायचे, पण शाळेत ते चालत नसे. त्यामुळे फाउंटन पेनशीच गट्टी होती.
माझ्या वडिलांनी पण माझे पेन वेड जाणले होते, त्यांनी खूप लाड पुरविले माझे. आठवी नववीत कधीतरी वडिलांनी माझ्या साठी "काळे पेन्स " मधून फाउंटन पेन आणले आणि माझे कॅम्लिन वरचे प्रेम उडाले. अतिशय सुंदर लिहायचे ते, एकदम भारी नीब होते त्याचे.
दहावीच्या परिक्षेसाठी खास काळे यांचेच पण
पंपने शाई भरायचे पेन दोन तीन महिने आधीच वडिलांनी आणले. नीब वापरून ते परीक्षेपर्यंत एकदम मस्त झाले. चेलपार्कची काळी शाई आणि काळे पेन एकदम मस्त जोडी जमली होती.

हे मुख्य पेन आणि बाकीची जोडीला, अगदीच शाई संपली तर. मला कोणी पेन मागितले तर द्यायला माझ्याकडे वेगळा स्टॉक असायचा. नीबचे वळण जायला नको म्हणून मी कोणालाही ते पेन द्यायची नाही. फार possessive होते मी.
हे पेन मी B.Com शेवटच्या परीक्षेपर्यंत वापरले. सगळ्या मैत्रिणींना आश्चर्य वाटायचे की मी फाउंटन पेन ने इतके फास्ट कसे लिहू शकते? बाकीच्या शाळा संपल्यास बॉलपेन वापरू लागल्या होत्या.

बँकेत रुजू झाल्यावर मात्र मला बॉलपेन वापरायला लागले कारण बँकेत फाउंटन पेनने लिहिलेले चालत नसे. 1984 साली बॉलपेन ची क्वालिटी तितकीशी चांगली नव्हती. नवीन पेन जरा तरी चांगले लिहायचे, पण रिफिलची बोंबच असायची. त्यातली त्यात Wilson ची रिफिल चांगली असायची. पण ती ठराविकच दुकानात मिळायची.
ऐकावेळी माझ्याकडे कमीत कमी पाच सहा पेन्स असायचीच. बँकेतल्या सहकर्मचाऱ्याने सांगितले की रिफिल बँकेतून मिळते, मॅनेजर साहेबांकडे असते. मी विचारायला गेल्यावर त्यांनी रिकामी रिफिल मागितली. असं डोकं सटकले की त्यांना सरळ सांगितले की माझे वडील मला दर महिन्याला नवीन पेन देतात, तुमच्या रिफिलची मला गरज नाही. त्यानंतर VRS घेईपर्यंत कधीही बँकेतून रिफिल घेतली नाही. माझी मीच छान छान पेन आणत असे. जेव्हा जेव्हा भेटवस्तू द्यायची वेळ येते तेव्हा माझा पहिला पर्याय " पेन" असतो. सगळ्या वयोगटासाठी उत्तम भेट आहे असे मला वाटते. पण पेन सेट नाही आवडत मला. तो नुसता शो, लिहायला मजा नाही येत त्याने.

माझे पेन वेड सगळ्यांना माहीत झाले आहे, त्यामुळे नवीन किंवा लिहायला चांगले वाटले की आठवणीने माझ्यासाठी घेऊन येतात. खूप
कंपनीची खूप प्रकारची पेन्स मी वापरली. बँकेत असल्यामुळे पेन पण खूप लागायची. Reynold मला सगळ्यात जास्त आवडते त्यात सुद्धा Reynold Jetter.🖊

हळूहळू माझ्याकडच्या पेन्स ची संख्या वाढत गेली. एकदा माझी पर्स बँकेतून चोरीला गेली. सगळे विचारत होते किती पैसे होते? महत्वाचे काय काय गेले? आणि मला मात्र माझी20/25 पेन्स दिसत होती. नक्की कुठली कुठली गेली ते पण माहीत नव्हते.😢

नेहमी अशी चेष्टा करतात ना की बँकेत पैसे मोकळे असतात आणि पेन बांधून ठेवतात, पण ते तसे करावे लागते. मुद्दाम कोणी नाही नेत पण नेतात! आणि माझ्यासारखी कोणी पेन वर जीव टाकणारी असेल तर मग पूर्ण दिवस बेचैनीत जातो. प्रत्येक पेन बरोबर एक वेगळे नाते जडलेले असते.
मी स्वतःच्या आणि ग्राहकांसाठीच्या पेन वर हजारो  रुपये खर्च केले आहेत. पण "बांधलेल्या पेनला" पर्याय नाही सापडला .😄

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस