स्मितानुभव#31 मोठी आई
मोठी आई ....यमुना गोपाळ बेहेरे
मोठया आईचा जन्म 1905 सालचा.
काय बोलायचे तिच्याबद्दल !
ती अप्पांची सावली होती. मुर्ती लहान पण एकदम धीराची होती. अप्पांचा स्वभाव रागीट, त्यामुळे तिचे काम एकच मुलांना त्यांच्या रागापासून वाचविणे. अप्पांचा जोरात आवाज आला की ही आधीच म्हणायची की मी केले आहे. मग ते काहीही असुदेत.
म्हणजे हे इथे कुणी ठेवले पासून ......मांजराची पिल्ले कुणी आणली? असा प्रश्न कुठलाही असला तरी उत्तर एकच😆
ह्या उत्तराने वातावरण निवळायचे.
मला आठवते ती, तशी थकलेलीच होती. परिस्थितीचे खूप उतार चढाव तिने पाहिले होते. पण चेहरा नेहमी प्रसन्न आणि समाधानी असे.
ती स्वयंपाक करताना मला फारशी आठवत नाही. पण ताक करणे, लोणी काढणे, तूप करणे ही खास तिची कामे. पाचक खूप मस्त करायची, काहीही झालेले नसताना पण मी ते आवडते म्हणून प्यायची. देवपूजा पण तिच करायची. सगळे शांतपणे. तिचं आणि माझ्या आईच मस्त ट्युनिंग होत. दोघीत कधी वाद नाहीत की फारशी बोला चाली पण नाही. सगळं शिस्तीत पार पाडायच्या दोघी.
दुपार नंतर ती थकायची, पण बसल्या बसल्या डाळींब्या सोलायची. खरं तर तेव्हा मला तिचा राग यायचा. कारण आठवड्यात दोन तीनदा त्याचेच तोंडी लावणे असायचे. तेव्हा काही फ्रिज नव्हता. पण आता सहज खायला मिळत नाहीत तेव्हा तिची फार आठवण येते. मला खूप आवडतात डाळींब्या....उसळ पण आणि आमटी पण😋
आमच्यासाठी ती खास दूध करायची. मनुका , खारीक आणि बदाम रात्री दुधात भिजवून ठेवायची आणि रोज सकाळी ते सगळे आम्ही चावून खायचे आणि वर दूध प्यायचे. तिचे ते टॉनिक अजून मला पुरते आहे. तिची आणखी एक सवय होती, आम्हाला काहीही अगदी औषध सुद्धा द्यायच्या आधी ती स्वतः ते चाखून पहायची. हे चाखून पाहणे एकदा तिच्या जीवावर पण बेतले होते. सुपारी म्हणून कसले तरी विषारी औषध तिने तोंडात टाकले होते. वेळेवर लक्षात आले आणि पुढचा अनर्थ टळला.
तिचे वाचन पण खूप होते. लायब्ररीतून मासिके, पुस्तके आणून वाचायची. रोज वर्तमानपत्र वाचायची. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर मात्र तिला वाचायला जमेनासे झाले. मग आम्ही तिला वाचून दाखवायचो. जक्कल सुतारच्या वर्तमानपत्रातील बातम्या आम्ही दार लावून ( भितीमुळे...तेव्हा पुण्यात दहशतीचे वातावरण होते. ) तिला वाचून दाखविले होते.
मोठीआई मदतीसाठी नेहमी तयार असायची. रात्री शिल्लक राहिलेले अन्न घ्यायला एक भिकारीण रोज यायची. तिला अन्न दिल्याशिवाय
तेही गरम करून, मोठीआई कधी झोपली नाही. केलेल्या चहाचा चोथा ती परत वाळवून ठेवायची आणि तो त्या भिकरिणीला द्यायची. अग एकवेळचा तरी चहा होईल ग तिचा असे आम्हाला सांगायची. उचलून पैसे द्यायला नेहमी जमतेच असे नाही शिवाय त्यामुळे फुकट घ्यायची पण त्यांना सवय लागते म्हणून तिने तिच्यापरीने उपाय शोधला होता.
योग्य ती काटकसर आणि सगळ्या गोष्टी निगुतीने करणे हे गुण तिच्याकडूनच मिळाले आहेत. माणुसकी हा तिचा धर्म होता आणि तो आम्ही पाळत आहोत.
मोठीआईला 1951 साली शब्दकोड्यात रुपये 23000/- बक्षीस मिळाले होते, त्यातून ओम सदन
ही वास्तू उभी करण्यास हातभार लागला.
ती.अप्पा आणि मोठीआईच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या वास्तूत माझे बालपण गेले, अजूनही ह्या सगळ्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत.
🙏🙏🙏🙏🙏🙏
#स्मितानुभव 31
Comments
Post a Comment