स्मितानुभव #30 दहावी बारावी

दहावी बारावीचे रिझल्ट लागायला सुरवात झाली आहे. त्यामुळे माझ्या मुलांच्या वेळी झालेल्या घटना मला आठवल्या.

दहावीतील मुले तशी लहानच असतात, पुढच्या आयुष्यात बद्दल ती अजून तितकीशी गंभीर नसतात. त्यामुळे त्यांचे यश हे मिळालेल्या गुणांवर न ठरवता त्यांनी हा एक महत्वाचा टप्पा पार केला ह्या दृष्टीने बघावे. दोन पाच मार्क कमी मिळाले म्हणून सुतकी वातावरण असलेली घरे मी पहिली आहेत. आणखी एक प्रकर्षाने आढळलेली गोष्ट म्हणजे तुलना. त्याला बघ 90 टक्के मिळाले आणि तुला 85 असे कधी म्हणू नये. प्रत्येक मुलाची आवड वेगवेगळी असते आणि क्षमता पण. तुझे मार्क चांगलेच आहेत अजून प्रयत्न केलास तर आणखी पुढे जाशील असे म्हटले तर अभ्यासाला जास्त हुरूप येतो.
माझी मुले एकाच वर्गात असल्यामुळे  दोघांनाही ह्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. मुली जात्याच थोडया जास्त सिनसियर असतात, तर मुलगे हूड असतात. मुलांना अभ्यासापेक्षा इतर गोष्टीची जास्त आवड असते.
"अरे वा तुम्ही जुळी आहात?मग तुमच्यापैकी कोण हुशार आहे?" असा सहज प्रश्न विचारला जायचा.
हर्षद स्नेहा चटकन म्हणायचे की आम्ही दोघेही हुशार आहोत. इथे हे थांबायचे नाही,पुढचा प्रश्न "नाही म्हणजे तुमच्यात जास्त हुषार कोण आहे?"
मग ती दोघे माझ्या तोंडा कडे बघायची. मी मग त्यांना शिकवून ठेवले की आम्ही दोघेही हुशार आहोत, पण आमची क्षेत्र वेगवेगळी आहेत.
दहावी दोघेही आपापल्या कुवतीनुसार चांगल्या मार्कांनी पास झाली. आम्ही खूप जोरात आनंद साजरा केला.
बारावीला तर सगळे आवडते विषय असल्यामुळे फार काही प्रश्न आला नाही. दोघेही विज्ञान शाखेत रमली असल्यामुळे उत्तम यशाची खात्री होती. निकाल  लागायच्या आदले दिवशी ती पुण्याहून मुंबईला परत आली. मी त्यांना पुण्याहून चितळ्यांचे केशरी पेढे आणायला सांगितले होते. यशाची खात्री सगळ्यांनाच होती, त्यामुळे quarters मध्ये, आमच्या दोघांच्या शाखेत सगळेजण पेढे मागणारच म्हणून आणायला सांगितले. अपेक्षेप्रमाणे रिझल्ट चांगलाच लागला. पालक म्हणून खूप अभिमान वाटला आम्हाला.

दुसऱ्या दिवशी मी पेढे घेऊनच बँकेत गेले. दारातच एक मैत्रीण भेटली, तिचा मुलगाही बारावीला होता. तिने माझ्या मुलांचे मार्क विचारले आणि वा वा म्हणून जागेवर जाऊन तोंड पाडून बसली. मला काहीच कळेना आणि ती पण काहीच बोलेना. बाकी कोणालाही तिने काही सांगितले नाही. मग मी पण पेढे दिले नाहीत आणि कुणी मला मागितले ही नाहीत. तिला दुःखी बघून मलाही माझा आनंद साजरा करावासा वाटला नाही. पेढे  मी गपचूप घरी घेऊन गेले. मग दोन तीन दिवस सुट्टीवर होती.
त्यामुळे जास्तच वाईट वाटले. नेहमी आधी वाईटच विचार येतात त्यामुळे सगळ्यांना वाटले की तिचा मुलगा नापास झाला.
खरं म्हणजे तो नापास नव्हता झाला, पण मार्क  कमी पडले होते. मला जर हे त्याचं दिवशी समजले असते तर तिची समजूत घालून तिन्ही मुलांचं यश मी दणक्यात साजरं केले असते.
तिच्या अश्या वागण्याने बर्वे मॅडमची पार्टी झाली नाही म्हणून सगळे हळहळत होते.😊😊

#smitanubhav 30

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस