स्मितानुभव #29 ती.अप्पांचा दृष्टिकोन
काल मी ती.अप्पांबद्दलचा अनुभव पोस्ट केला, पण नंतर वाटले हे अजून अपूर्ण आहे. त्यांचा विशाल दृष्टिकोन मी अंकीत केलाच नाही.
मला दोन काका आणि तीन आत्या. सगळ्यांना उत्तम शिक्षण द्यावे अशी त्यांची इच्छा होती. पण आजारपणामुळे बरेच दिवस बिनपगारी रजा झाली. थोडे कर्ज पण झाले. त्यामुळे मोठी आत्या आणि मोठे काका मॅट्रिक पर्यंतच शिकू शकले. आत्याचे लग्न झाले आणि काका पोस्टात नोकरीस लागले. दुसरी आत्या शिकत असतानाच तिचेही लग्न झाले पण तिने आपली पदवी प्राप्त केली. धाकट्या आत्याने मॅट्रिक नंतर शारीरिक शिकक्षणातील पदवीका घेतली. तर माझे वडील द्विपदविधर( Msc). माझ्या आईचे लग्न झाले तेव्हा ती 'बी ए' च्या शेवटच्या वर्षाला होती. त्यांनी तिला प्रोत्साहन तर दिलेच शिवाय अभ्यासात मदत केली. त्यामुळे माझी आई पण पदवीधर होऊ शकली. धाकटे काका शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत म्हणून त्यांना चित्रकलेच्या परीक्षा द्यायला प्रवृत्त केले. टर्नर फिटर, बुक बायडिंग असे कोर्स पण करायला लावले.
खरं सांगते लहानपणी मला जात वगैरे काही माहीत नव्हते. इतक्या जुन्या काळी सुद्धा आमच्याकडे सोवळे ओवळ्याचे स्तोम नव्हते. गणपती, सत्यनारायण ह्या दिवशी नऊवारी नेसून आई सोवळ्यात स्वयंपाक करायची पण त्याचे अवडंबर कधीच नव्हते. नोकरी निमित्ताने ते खूप फिरले असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल होता.
आमची विठाबाई तरी घरी आल्यावर आधी देवघरात जाऊन देवदर्शन करायची आणि आजी आजीबांच्या पाया पडून मग कामाला लागायची.
अपंग असल्याने त्यांच्या हालचालींवर बंधन होती. ते पटकन उठू शकायचे नाहीत. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्यांनी अश्या सोयीने ठेवून घेतल्या होत्या की कोणाच्याही मदती शिवाय ते त्यांची कामे करू शकत असत. स्वयंपूर्णता हा गुण त्यांच्याकडूनच आमच्यात आला आहे.
मध्यंतरी मी त्यांची काही कागदपत्रे आवरली. त्यात मला अनेक देणगी दिल्याच्या पावत्या सापडल्या. त्याकाळी त्यांनी रु. 100,150,201 अश्या देणग्या दिल्याच्या पावत्या सापडल्या आहेत. तेव्हा हा एक नवीन पैलू मला कळला.
त्यांनी इच्छापत्र केलेले आहे, त्यात त्यांनी तीन चाकी सायकल गरजूला देऊन टाकावी असे नमूद केले आहे.
कोणी गरजू आढळलला की त्याला काहीतरी काम देऊन मदत करायचे.
हवालदार रत्नपारखी,भानुदास,चिंधु हे सगळे मला आजही आठवतात. अप्पा गेल्यानंतर पण ही सगळी मंडळी आमच्याकडे येत होती. इतकंच काय चिंधु गेल्यावर त्याचा मुलगा येवून बागकाम करायचा आणि नारळ उतरवून द्यायचा.
त्यांनी "ओम सदन " ही वास्तू बांधली,आजही ही वास्तू पुण्यात दिमाखात उभी आहे, त्यांच्या लेकाचेही कर्तृत्व दाखवत.
#smitanubhav 29
Comments
Post a Comment