स्मितानुभव #28 ती.अप्पा
श्री.गोपाळ महादेव बेहेरे
मोठेपणीच्या सवयी,चांगल्या किंवा वाईट गोष्टीचे बीज लहानपणीच पेरले जाते असे मला वारंवार वाटते. आज मी माझ्या आजोबांबद्दल सांगणार आहे. सगळे त्यांना अप्पा म्हणायचे. मला त्यांचा सहवास फक्त 9 वर्ष लाभला. त्यातली पहिली काही वर्षे सोडली तर लक्ष्यात राहिलेली पाच सहा वर्षच आहेत. पण आजही त्यांच्या शिकवणीचा प्रभाव माझ्यावर आहे.
त्यांचा जन्म 24 जून 1900 सालचा! सहा फुट 1 इंच उंची. लहानपणी उंची वगैरे काही कळायचे नाही, मी सांगायची की माझे आजोबा इतके उंच आहेत की कॉटवर झोपल्यावर त्यांचे पाय बाहेर येतात. सडसडीत शरीर यष्टी. अतिशय तापट पण तितकाच प्रेमळ स्वभाव.
खूप लहान असतानाच ते कोकणातून बाहेर पडले. त्याकाळचे ते मॅट्रिक होते आणि पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करत होते. पोस्टमास्टर म्हणून ते काळबादेवी मुंबईहून निवृत्त झाले होते.
त्यावेळच्या प्रथेप्रमाणे लहान भावानांपण शिक्षणासाठी कोकणातून बाहेर नेले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली होती.
तसेच आजीच्या भावाबहिणींना पण सहाय्य केले होते. हे सांगायचे कारण की ह्या सगळ्यांची
ती.अप्पांबद्दलची कृतज्ञतेची भावना मी अनुभवली आहे.
ती. अप्पा स्वतः वयाच्या 42 व्या वर्षी सायटिका मूळे अपंग झाले होते. त्या नंतर त्यांनी सगळे कसे खंबीरपणे निभावले त्याच्या गोष्टी मी माझ्या वडिलांकडून आणि इतर ज्येष्ठ लोकांकडून ऐकल्या आहेत. ह्यात माझ्या आजीची त्यांना सक्रिय साथ होती हे वेगळे सांगायला नकोच. त्यांच्या आणि आमच्याही दुर्दैवाने माझे धाकटे काका मनोरुग्ण होते. त्या काळातही अप्पांनी त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले होते. गंडे दोरे,उतारे,उपास तापास असले न करता व्यवस्थित औषोधपचार केले होते.
श्री दत्तावर आणि अक्कलकोट स्वामींवर त्यांची श्रद्धा होती. दर गुरुवारी ते एकतारी घेऊन भजन म्हणायचे.
चिपळ्या,खडावा,रुद्राक्षाची माळ,जप करताना हाताखाली घ्यायचा स्टँड, (रामदास स्वामींच्या फोटोत असतो तसा) पुस्तकांचे फिरते लाकडी टेबल, बुक स्टँड अश्या बऱ्याच युनिक गोष्टी त्यांनी घेतल्या होत्या. आम्ही अजूनही त्या जपून ठेवल्या आहेत.
मला आठवतात ते अप्पा सतत उद्योगात असलेले. काटकसरीने पण दिमाखात कसे रहायचे ते यांच्याकडूनच शिकलो आम्ही. ते अतिशय हुशार होते. घरात किंवा त्यांच्यासाठी सहज रीतीने सोयी सुविधा कश्या करता येतील किंवा करून घेता येतील ह्यात ते फार हुशार होते.
आमच्याकडे एक टेबल फॅन होता( अजून आहे),तो गोल फिरायचा नाही, फक्त खालीवर व्हायचा. हाताने दिशा बदलावी लागायची. तेव्हा पुणे इतके थंड होते की सिलिंग फॅन नव्हताच घरी. अप्पांना खूप जोरात खोकल्याची उबळ यायची आणि त्यांचा जीव घाबरा व्हायचा तेव्हा पंख्याची गरज वाटायची. अप्पांनी तो पंखा छताला उलटा टांगून घेतला आणि त्याच्या कडीला मोठया दोऱ्या बांधल्या. कॉटवर बसून ते आरामात पंखा हवा तसा फिरवू शकायचे. टेबल फॅनचा सिलिंग फॅन करून टाकला त्यांनी. ते तीन चाकी सायकल वरून बाहेर जायचे. स्वतःच चालवत.
मला आणि माझ्या लहान बहिणीला ते शुद्धलेखन घालत असत आधी पुस्तकातून नंतर नंतर वर्तमानपत्रातून. ते स्वतः तपासत असत आणि चुकलेले शब्द पुन्हा लिहायला लावत असत. ह्या मुळे आमचे लिखाण शुद्ध झाले, अक्षर चांगले झाले आणि भाषा सुद्धा. ही शिदोरी आजही आहे आमच्याजवळ.
बागकामाची त्यांना खूप आवड होती. खूप झाडे होती बागेत. जातील तिथून बिया नाहीतर रोपे घेऊन यायचे आणि स्वतःच्या देखरेखीखाली लावून घ्यायचे, मध्ये मध्ये आमची लुडबुड चालायची. नारळाचे झाड लावायला विशिष्ट पद्धतीने खड्डा खोदतात. त्यांनी माणसे पण खूप जोडली होती. त्यापैकी एक भानुदास म्हणून होता. अप्पा मापे सांगत आहेत आणि भानुदास तसे खड्डे खोदत आहे आणि मी व नीता बाजूला उभ्या आहोत हे चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे.
शाळेला सुट्टी असली तरी ते आम्हाला मोकळे बसू देत नसत. नारळाच्या झावळ्या साठवून ठेवलेल्या असत. त्याचे हीर काढून बाकीचे बंबात पाणी तापवायला वापरायचे. आमच्यासाठी लहान लहान सुऱ्या करून घेतल्या होत्या. त्यांनी ते हीर आम्ही सोलायचो नंतर भानुदास कडून त्याचे खराटे बांधून घेत असत. ही सतत कामात असण्याची सवय अजूनही आहे, कालपरत्वे हातातील गोष्टी बदलेल्या आहेत.
त्यांना फोटोग्राफीची पण खूप आवड होती.आजी आजोबांचे,माझे वडील आणि त्यांची भावंडे ह्याचे भरपूर फोटो त्यांनी काढले होते किंवा काढून घेतले होते. आजही आम्ही व्यवस्थित जपून ठेवलेले आहेत.
प्रेमळ धाकात त्यांनी आमचे घर बांधून ठेवले होते आणि आज आम्ही त्यांचा वारसा जपायचा प्रयत्न करत आहोत.
75 वर्षांचे आयुष्य लाभले त्यांना.
राजेशाही थाटात राहिले आणि आमच्यासाठी समृद्ध वारसा ठेवून गेले.
माझा लेक मला म्हणतो "आई काय ROYAL फॅमिलीत जन्मली आहेस तू!"
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#smitanubhav 28
Comments
Post a Comment