स्मितानुभव #25 अहिल्याबाई होळकर

मला नेहमी असे वाटते की काही काही गोष्टी ह्या खास एखाद्याच्या नशिबात असतातच. काहीही झाले, कितीही अडचणी आल्या, कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न केला तरी त्या होतातच. काहीसे असेच झाले माझ्या बाबतीत.

आम्ही पाच मैत्रिणी शाळेपासून एकत्र आहोत. जवळपास 40 वर्षांची आमची मैत्री आहे. भेट कधीतरीच व्हायची, पण नाळ जोडलेली आहे. आता सगळ्याच जणी जरा मोकळ्या झालो आहोत. आशा उज्जैनला राहते. तिच्या लेकीचे लग्न होते म्हणून आम्ही बाकी चौघींनी तिच्याकडे जायचे ठरवले. मी बेंगलोरहून आणि बाकी तिघी पुण्याहून. तिकिटे खूप आधीच बुक केली. काही कारणाने ते लग्न रद्द झाले. आमची पंचाईत झाली आता कसे जायचे? आमचीच मैत्रीण ती, आम्हाला पूर्ण ओळखून होती. तिने सांगितले ठरल्याप्रमाणे तुम्ही येत आहात, तिकीट रद्द वगैरे करायचे नाही. वैयक्तिक कारणामुळे दोघींना जमले नाही, पण मी आणि मेधा आम्ही दोघी गेलो. आशाने खूपच सुंदर व्यवस्था केली होती.

इंदौर,माहेश्वर अशी ट्रिप करायचे ठरवले होते. हे सगळे सुंदरच आहे. वर्णन करायला शब्दच अपुरे आहेत.

मला "अहिल्याबाई होळकर" ह्या व्यक्तिमत्त्वाने दिपवून टाकले. खरोखर भारावून गेले. काय दूरदृष्टीआहे ह्या देवीची! इतिहासाच्या पुस्तकांत फारतर अर्ध पान माहिती दिली आहे त्यांची.

लौकिकदृष्ट्या काहीही शिक्षण नाही की कुठली पदवी नाही. काळ जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा.
तसे बघायला गेले तर खाजगी आयुष्य दुःखी. लहान वयात वैधव्य, मुलाचा अकाली मृत्यू, पोटची लेक सती गेली. आपलं म्हणावं अस जगात कुणी नाही. जे काही करायचे ते प्रजेसाठी, रयतेसाठी ....निःस्वार्थपणे!

राजवाडा, नर्मदेचा घाट खूप सुंदर आणि भक्कम  बांधला आहे. बहुतेक पुढील पाचशे वर्ष सुद्धा त्याला काही होणार नाही. इतके मजबूत बांधकाम आहे.

अहिल्याबाई ह्या एकमेव देवी आहेत की ज्या रोज ब्राह्मणांकडून जनकल्याणासाठी रुद्राभिषेक करून घ्यायच्या. काय मागणं मागायचे ते प्रजेसाठी. एक संस्कृत श्लोक आहे, ज्याचा जप केल्यामुळे गतवैभव परत येते आणि असलेले चिरकाल राहते. त्याचे त्या पठण करून घेत असत. हे राजवाड्यात लिहिलेले आहे, पण फोटोला परवानगी नाही. तरी आठवला तेव्हढा श्लोक मी लिहून ठेवला आहे.

त्यांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे नद्यांवर घाट बांधले. अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. खूप झाडे लावली. धर्मशाळा आणि पाणपोया बांधल्या. उद्योगधंद्याला चालना दिली. तिथली माहेश्वरी साडी आजही जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी केलेल्या बांधकामाचा , भारताचा नकाशा तिथे लावलेला आहे, खरं तर नकाशा दिसतच नाही सगळीकडे सिम्बॉलच दिसतात.
हे सगळे करताना त्या शत्रूंशी पण दोन हात करतच होत्या. स्वतः लढाईला जात असत. सत्तर वर्षाचे आयुष्य लाभले त्यांना पण सातशे वर्षांचे काम केले आहे त्यांनी.
निघताना एक खंत वाटली एव्हढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व
आणि त्यांचे अवाढव्य काम नीट जपलेले नाही. खूप अव्यवस्थित ठेवले आहे सगळे.

अजून काही राहिले असेल तर देवी क्षमा करा.

      "  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
                  यांना शतशः नमन "
       🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान् ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ १॥

श्लोक गुगल वरून घेतला.12 श्लोकांचे स्तोत्र
आहे.
#smitanubhav 25

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस