स्मितानुभव #24 पेरू

पुण्याला आमच्या बंगल्याच्या आवारात भरपूर झाडे होती. आजोबांनी ,नारळ,आंबा,चिक्कू,चाफा,अशोक
सुरू,पेरू इत्यादी झाडे लावली होती.
त्यातले पेरुचे झाड बंगल्याच्या पुढच्या भागात होते. पेरूचा वर्षात दोनदा हंगाम असायचा आणि पुढे तीन चार महिने फळे येत रहायची. त्यामुळे जवळजवळ आठ नऊ महिने पेरू मिळायचे.

पहिल्यांदा झाडावर कधी चढले ते आता आठवत नाही. बहुदा कोणीतरी उंचावरचा पेरू काढण्यासाठी चढवले असेल. घरात मीच मोठी मुलगी होते त्यामुळे असेल कदाचित.
हळूहळू मला एकटीला चढता येऊ लागले. मी आधी वर चढायची आणि नंतर आई पिशवी द्यायची पेरू ठेवायला. दररोज दहा पंधरा तरी पेरू निघायचेच. पानाआड लपलेले पेरू आई खालून सांगायची, त्या दिशेने पुढे जाऊन मी तोडायची.
आधी छोटेसे फुल, मग छोटा पेरू, हळूहळू वाढत जाणार आकार आणि नंतर गडद हिरव्या रंगाकडून फिक्या पोपटी रंगाकडे होणारी वाटचाल हे जवळून बघताना खूप मजा यायची. मला जरा कडक पोपटी रंगाचा पेरू आवडतो, त्यामुळे तसा पेरू झाला की मी तोडायची. पण तसा पेरू आजी आजोबांना खाता यायचा नाही म्हणून काही पेरू मुद्दाम पूर्ण पिकून पिवळे होईपर्यंत राखून ठेवायची.
पाचवी ते सातवी माझी शाळा सकाळची असायची, शाळेतून येतानाच पोटात कावळे ओरडत असायचे. दारात दप्तर ठेवायचे आणि पेरूच्या झाडाकडे धाव घ्यायची. दोनतीन पेरू मटकावूनच खाली उतरायचे. मग जेवण आणि नंतर उरलेले पेरू काढायचे. कधी कधी सकाळीच शाळेच्या आधी पेरू काढायचे आणि मैत्रिणीं साठी शाळेत घेऊन जायचे. ताजे ताजे रसाळ पेरू सगळ्यांना खूप आवडायचे. तेव्हा धुवून वगैरे खाण्याची भानगड नव्हती. फारतर युनिफॉर्म ला पुसायचा.😊

हळूहळू उंची वाढत गेली, मला झाडावर चढता येईना मग मी तो वारसा धाकट्या बहिणीकडे दिला.

स प महाविद्यालयाच्या बाहेर, एक मोठं पागोटे  बांधलेले आजोबा पेरू विकायचे. त्यांच्या कडचे पेरू पण खूप छान असायचे. ते पण मला खूप आवडायचे. पण ते जरा महाग असायचे म्हणून मी कधीतरीच घ्यायची. कधी कधी आजी पण त्यांच्या कडून पेरू आणायची. बाकी कुठले पेरू मला आवडायचे नाहीत.
नंतर चिखलीला असताना पुन्हा मला तसे रसाळ पेरू मिळाले. पेरू विकणारे दोघेजण होते. दोन सायकल वर गच्च टोपलीभर ताजे ताजे पेरू घेऊन ते सकाळीच बँकेत आदल्या दिवशीचे पैसे भरायला यायचे. शप्पथ सांगते मला त्यांचा हेवा वाटायचा.....रोज इतके पेरू! म्हणजे किती झाडे असतील यांच्याकडे! आता त्यांच्याकडच्या पेरूंनीच माझा दिवस सुरू होऊ लागला. माझ्या हातून त्यांची "भोवनी" होऊ लागली.
हळूहळू मी सगळी माहिती काढली. त्यांनी गावातील बाग भाडेतत्वावर घेतली होती. बागेची काळजी ते संपूर्ण वर्ष घ्यायचे. झाडाला पाणी कधी आणि किती घालतो त्या प्रमाणे पेरूची गोडी ठरते आणि ते गणित ह्या दोघांना पक्के जमले होते. माझी आवड पाहून त्यांनी बाग बघायला बोलावले. मला तर जग जिंकल्याचा आनंद झाला.
आम्ही तिघी मैत्रिणी गेलो होतो. खूप छान स्वागत केले त्यांनी. पोपटाने चोच मारलेले, खूप पिकलेले,आपोआप गळून पडलेले आणि ताजे तोडलेले असे सगळ्या तऱ्हेचे पेरू ठेवले होते. वर म्हणाले हवे ते तोडून घ्या किंवा सांगा ते काढून देतो.आईशप्पथ मी वेडी झाले नाही हेच विशेष

आता सुध्दा लिहिताना तोंडाला पाणी सुटले आहे आणि पेरुचा वास येतो आहे........
#smitanubhav 24

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस