स्मितानुभव# 23 संध्या

काल मी म्हटले की संध्या नावाची बाई....पण ती बाई नसून मुलगीच होती, खरं तर आम्ही दोघीही मुलीचं होतो. संध्या चांगल्या घरची हाती. ती माझ्या धाकट्या बहिणी एव्हढी होती. माझी मुले जात्याच समजूतदार किंवा परिस्थितीने समजूतदार झाली होती. त्यांनी संध्याला चटकन आपलं मानले आणि ती त्यांची मावशी झाली.

तिचा टिपिकल प्रॉब्लेम होता, लग्नाला जेमतेम तीन वर्षे झाली होती. पदरात एक छोटी मुलगी होती. नवरा काही करत नव्हता म्हणून माहेरी चिंचवडला आली होती. माहेरची परिस्थिती पण बेताचीच होती. हिला काम करण्यावाचून गत्यंतर नव्हते. आईनं तिच्या मुलीला संभाळण्याची जबाबदारी घेतली होती आणि तिचे नी माझे ऋणानुबंध जुळले. माझी तिला एकच अट होती की दांडी मारायची नाही, काहीही झाले तरी कामाला यायचेच.

जेमतेम आठ पंधरा दिवस झाले असतील, रुटीन बसले असे वाटत असताना ही आपल्या मुलीला घेऊन आली. आईने नातीला बघायला नकार दिला होता. संध्याची मुलगी खूपच गोड होती. त्या निरागस जीवाला पाहून मी तिलापण घेऊन ये अशी परवानगी दिली आणि अध्याय पुढे सुरू झाला.

तिचे सासर तळेगावला होते. कधी ही तळेगावला जायची, कधी परत चिंचवडला यायची. असे चालू होते. तळेगावहून आली की तिची माझी भेट व्हायची नाही. मुलांची शाळा सकाळची होती. त्यामुळे शेजारी किल्ली ठेवून मी निघून जायची. कधी कधी चिडचिड व्हायची. मी तिला रागवायचे वेळेत येत जा म्हणून. खरं तर आम्ही दोघीही परिस्थिती पुढे हतबल होतो. जगातील आमची एकमेव जोडी असेल की तिचा स्वयंपाक मी करून जात असे आणि ती जेवत असे. तिच्या घरी तिची सासू स्वयंपाक करायची त्यामुळे हिला काहीही येत नव्हते.
राग,चिडचिड, धुसफूस मधून मधून चालू असायचेच, पण दोघींनाही आणि मुलांनाही एकमेकांचा लळा लागला होता. मी पण तिला माझे काम सांभाळून सकाळच्या वेळी आजूबाजूला काम करण्यास परवानगी दिली. तिच्या मुलीच्या शाळेसाठी मी सगळी मदत केली. तिचे पण शिक्षण सुरू झाले. तीन चार वर्षे त्यामानाने चांगली पार पडली. माझी मुले पण मोठी झाली होती. पाचवीत त्यांची शाळा दुपारची झाली. खरं तर आता संध्याची तशी काही जरुरी नव्हती, पण का माहीत नाही मी तिला काढले नाही.

एके दिवशी संध्याकाळी मी घरी आल्यावर म्हणाली मी काम सोडते आहे. मला आश्चर्य वाटले. कारण तसे काही दिसत नव्हते. तर ती म्हणाली की बाकीकडे काही अडचण झाली आहे, मला इथे येणे शक्य नाही, माझी तुमच्या बद्दल काहीही तक्रार नाही. पण आत्ता आग्रह करू नका. खूपच उदास दिसत होती. मी पण ताणले नाही. मात्र बजावले कधीही अडचण आली तर हक्काने ये म्हणून.

मध्ये एकदीड वर्ष गेले असेल. अचानक एक दिवशी संध्या घरी आली आणि म्हणाली की मला एकही काम नाही, अगदी थोडे पैसे दिलेत तरी चालेल पण मी तुमच्याकडे येते.
तेव्हा माझी आई खूपच आजारी होती. मी तिला विचारले पुण्याला आईकडे काम करशील का? मी तुला तळेगांव पुणे रेल्वे पास आणि शिवाजीनगर ते भिकारदास मारुती अश्या पासचे पैसे पगारा- व्यतिरिक्त देते. खरं तर घरकामासाठी हे अंतर खूप होते तरीसुद्धा संध्या तयार झाली. एकतर आईचे घर खूप मोठे होते आणि आई अंथरुणावर असल्या कारणाने विश्वासू बाईची गरज होती. आंधळा मागतो एक डोळा ....अशी माझी स्थिती झाली. दोन चार महिने झाले असतील, आई पण थोडी हिंडू फिरू लागली होती आणि इकडे संध्याची सासू पडली. तिला पायापासून डोक्यापर्यंत लागले होते, तिचे करणे भाग होते आणि संध्याचे येणे बंद झाले. आमच्या दोघींची गरज निभावली होती.

असेच दोन तीन महिने गेले.एक दिवशी पुन्हा संध्या आली आणि कामाला येते म्हणाली आणि मी पण हो म्हणाले. ही ऑक्टोबर महिन्यातील गोष्ट. शैक्षणिक वर्ष संपले की आम्ही मुंबईला शिफ्ट होणार होतो. यजमान आधीच मुंबईला गेले होते.

साधारण 15 ऑक्टोबर च्या आसपास तापाने
फणफणून यजमान मुंबईहून परत आले. बाहेर दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे त्यांना कावीळ आणि टायफाईड झाला होता. त्यांना 20 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. नंतर सुद्धा 1 महिना ते घरीच होते. ह्या सगळ्या कठीण परिस्थितीत संध्याने घर व्यवस्थित सांभाळले. मध्यंतरीच्या काळात ती स्वयंपाक पण शिकली होती.तिच्यावर सगळे सोपवून मी बिनधास्त कामावर जात होते.
आम्ही मुंबईला जाई पर्यंत ती माझ्याकडेच होती. तिच्यावर घर सोपवून आम्ही मुंबईला रवाना झालो. देव आधी सोय करतो आणि मग संकट टाकतो ह्याचा आणखी एकदा प्रत्यय आला.

मध्यंतरीच्या काळात तिचे यजमान वारले. सुटली बिचारी. ईश्वर कृपेने आता सर्व ठीक आहे. मुलगी शिकली, सुस्थळी पडली आहे. खूप चांगली माणसे आणि एक गोड छोकरा आहे तिला. आईच्या कष्टाचे फळ लेकीला मिळाले आहे.

संध्या पण निवांत झाली आहे. सुखावली आहे.
#smitanubhav 23

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस