स्मितानुभव #22 संशय
साधारण 35 वर्षपूर्वी, म्हणजे आमच्या पिढीच्या करियरचा सुरवातीचा काळ जरा जास्त कठीण होता, असे आज वाटते. एक म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीला सुरुवात झाली होती. घरातून स्त्रीच्या करियरसाठी तितकासा पाठींबा मिळत नव्हता. "पाळणाघर " हा कन्सेप्ट नुकताच सुरू झाला होता. त्यामुळे *मुलांना सांभाळणे* हा नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा कायम ऐरणीवरचा प्रश्न होता. आताच्या मानाने पैसे पण कमी होते. माझी जुळी असल्यामुळे प्रश्न जरा जास्त गंभीर होता. सतत नवनवीन प्रयोग करावे लागत असत. त्या बद्दल नंतर कधीतरी लिहीन.
मुले चार वर्षांची असताना संध्या नावाची बाई दिवसभरासाठी घरी ठेवायचे ठरले. तशी ती थोड्याशा ओळखीने आली होती. मनात खूप धाकधूक होती. कशी असेल? मुलांना नीट बघेल ना? काही वेडेवाकडे वागणार नाही ना? एक ना दोन...
तिच्या आमच्या घरच्या पहिल्याच दिवशीची घटना. धाकधूक मनांत घेऊनच मी घरी आले, खरं तर दिवसभर कामात लक्षच लागले नव्हते. वाटेत शेजारच्या भेटल्या, त्या म्हणाल्या की जरा नीट लक्ष दे संध्याकडे, आज मी तिच्या हातात दोन रिन साबणाच्या मोठ्या वड्या बघितल्या. मी म्हटले "मी रिन वापरत नाही, त्यामुळे त्या माझ्याकडच्या नाहीत." त्यावर त्या म्हणाल्या की तू दिपकला (आमच्या येथील general स्टोअर चा मालक) सांगून ठेव की माझ्या नावावर तिला काहीही उधार देऊ नको. ह्या बायका काय वागतील ते सांगता येत नाही. मी हो हो म्हणून सटकले. का माहीत नाही पण ह्या बद्दल मी संध्याला काहीच विचारले नाही.
दोन दिवसांनी मी दीपक कडे गेले होते. आमची चांगली ओळख होती. तो म्हणाला " ताई मुलांना सांभाळायला नवीन बाई ठेवलीत का? दोन दिवसांपूर्वी ती दुकानात आली होती." मला एकदम शेजारणीचे शब्द आठवले. मी म्हटले " हो, पण तुला कसे कळले? तिने काही घेतले का तुझ्याकडून?"
त्यावर दीपक म्हणाला," तिनेच सांगितले की ती जुळी मुले सांभाळायला आली आहे ते. दोन साबणाच्या वड्या घेऊन गेली."
मी विचारले," किती पैसे द्यावयाचे साबणाचे?" दीपक म्हणला," नाही हो ताई , काही पैसे द्यायचे नाहीत, ती पैसे देऊन साबण घेऊन गेली आहे."
नकळत माझे हात जोडले गेले, संशयाचे धुके जमण्याआधीच विरून गेले होते.
तसं बघायला गेले तर अगदी क्षुल्लक गोष्ट होती ही ! अशी काय किंमत असेल दोन साबण वड्यांची? मी विचार न करता वागले असते तर लाख मोलाच्या संध्याला गमावले असते.
अजूनही आमचे संबंध आहेत. दोघींनाही खात्री आहे की गरज पडली तर एकमेकांसाठी आम्ही धावून जाऊ.
#स्मितानुभव 22
Comments
Post a Comment