स्मितानुभव #21 BankingbTips
कालच्या पोस्ट वरील प्रतिक्रिया वाचून असे मनात आले बँकिंग संदर्भात काही टिप्स द्याव्यात.
* शक्य तेव्हढी सर्व खाती संयुक्त ( जॉईंट ) असावीत. सर्व खात्यांना नामांकन ( नॉमिनाशन) दिलेले असावे. सगळ्यात महत्वाचे आपल्या जोडीदाराला किंवा एखाद्या जबाबदार व्यक्तीला सर्व आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती असावी.
* चेकबुक,पासबुक,ठेव पावत्या सुरक्षित ठेवलेल्या असाव्यात. चेक कधीही सही करून ठेवू नये.
* इंटरनेट पासवर्ड कधीही दुसऱ्यांना देऊ नये.लॉग इन पासवर्ड आणि transaction पासवर्ड एकत्र ठेवू नये. शक्यतो तो कुठेही लिहिलेला नसावा, नाहीतर सहज कोणाच्याही लक्षात येणार नाही असा लिहावा.
* व्यावसायिकांनी जास्त काळजीपूर्वक बँकेचे व्यवहार करावेत. रोज एकाच व्यक्तीला बँकेत पाठवू नये. किमान आठवड्यात एक दिवस तरी स्वतः जावे. विशेषतः रोख व्यवहार ज्यांचे आहेत त्यांनी ही काळजी घेणे आवश्यक आहे.
* लॉकरला पण नामांकन ( Nomination)
करावे. ज्याच्या नावावर लॉकर आहे त्याने एकट्या नेच operate करावा. मित्र मैत्रिणी, नातेवाईक ह्यांना बरोबर नेऊ नये. लॉकर बंद करण्यापूर्वी , बाहेर काही राहिले नाही ना ह्याची खात्री करून घ्यावी. सापडलेला किमती ऐवज परत करणे खूप अवघड जाते. इच्छापत्र करताना लॉकरचा स्पष्ट उल्लेख करावा.
* ATM कार्ड आणि PIN कधीही एकत्र ठेवू नये. दुसऱ्या कोणालाही देऊ नये. ज्याच्या नावाने कार्ड आहे त्यानेच ते वापरावे. जॉईंट अकाउंट असेल तर दोन वेगवेगळी कार्ड मिळतात.
*क्रेडिट कार्ड वापरताना पिन आपण स्वतः एंटर करावा. क्रेडीट कार्ड आणि पिन पण एकत्र ठेवू नये. दुसऱ्याचे कार्ड वापरणे कायद्याने गुन्हा आहे.
* एखादया बॅकेतील खात्यात जास्त व्यवहार नसतील तरी सहा महिन्यातून एकदा खाते ऑपरेट करावे. तीन वर्ष खाते वापरले नाही तर dormant होते. कालांतराने ते पैसे सरकार जमा होतात. ज्या खात्यात आपण व्यवहार करू इच्छित नाही ती खाती बंद करुन टाकावीत.
* बँकेतून कॅश काढताना तिथेच मोजून घ्यावी. चुकून कमी जास्त काही असेल तर लगेच कॅशियर ला सांगावे. जास्त दिले गेलेले पैसे हा त्याचा व्यक्तिगत तोटा असतो आणि जास्त आलेल्या पैशासाठी त्याला कारणे द्यावी लागतात. योग्य ग्राहक सापडला नाही तर हे पैसे सरकार जमा होतात.
* बँकेचे फॉर्म,स्लिप पूर्ण भरावी. खाते क्रमांक आणि खातेदाराचे नाव काळजी पूर्वक भरावे. मोबाईल नंबर जरी दिलेला असला तरी प्रत्येक वेळी स्लिप वर लिहावा. लागल्यास त्वरित संपर्क करता येतो.
* घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत.(ही सूचना सामान्य माणसासाठी आहे. मोठ्या कर्ज बुडव्या बद्दल मी काही बोलू इच्छित नाही). कागद पत्रांची पूर्तता वेळेत करावी. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की कर्जातील त्रुटींसाठी बँक ऑफिसर व्यक्तीगत जबाबदार असतो.
* सगळ्यात महत्वाचे आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवा. थोडे व्याज कमी मिळाले तरी हरकत नाही पण मुद्दल सुरक्षित रहायला हवे.
प्रत्येक जण आपल्या कुटूंबासाठी दिवसरात्र मेहनत करत असतो, इतकेच काय आपल्या नंतर कुटूंबाला आर्थिक साहाय्य मिळावे ह्यासाठी आयुष्यभर झटत असतो. पण वरील गोष्टींची पूर्तता नसेल तर स्वतःला आणि वारसांना पण त्रास होतो. ह्या सगळ्याची अनेक उदाहरणे माझ्या समोर घडलेली आहेत. खूप वेळा सगळे माहीत असून सुद्धा बँक स्टाफ असाह्य असतो. त्याला नियमाच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते.
थोडयाशा सतर्कतेने गोष्टी सुलभ होतात.
नेहमीच्या व्यवहारातील बहुतेक गोष्टी वर आल्या आहेत. आणखी काही माहिती हवी असेल तर जरूर विचारा.
वेळेवर घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो तसेच आहे हे.
#smitanubhav 21
Comments
Post a Comment