स्मितानुभव #20 ATM
आज थोडे ATM विषयी लिहावेसे वाटले.
सामान्य लोकांना आपल्या गरजेच्या वेळी लगेच पैसे मिळावे असे वाटते आणि ते नाही मिळाले की त्यांचा संताप अनावर होतो आणि मग बँकेला, सरकारला दूषणे द्यायला सुरुवात होते. ATM म्हणजे " असतील तर मिळतील "असे जोक करतात.
आज एक बँक अधिकारी म्हणून मला ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटते. एक बँकर म्हणून काही अनुभव सांगावेसे वाटतात. जबाबदार अधिकारी म्हणून ATM शी माझा खूप जवळून संबंध आला आहे.
ATM बंद होण्यास "कॅश नाही " हे एकच कारण कधीच नसते, किंबहूना हे कारण फार क्वचितच असते. रोजच्या टर्नओव्हरचा अभ्यास करून त्याप्रमाणे कॅशची व्यवस्था केलेली असतेच.
ATM चे हार्डवेअर खूप संवेदनशील असते. त्यात काहीही बिघाड झाला तर ATM, सुरक्षितता म्हणून बंद होते. ग्राहक गंमत म्हणून ATM कार्ड ऐवजी नाणे,पोस्टाचे तिकीट,visiting कार्ड,असे काहीही घालतात. हे सगळे त्याच्या अयोग्य आकारामुळे मशीनच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये अडकते आणि ATM बंद पडते. हे काढण्यासाठी टेकनिशीयनला बोलवायला लागते आणि म्हणूनच ATM बंद ठेवावे लागते.
कित्येक वेळा दिलेली कमांड मध्येच रद्द करायला बघतात, त्यामुळे आतील बेल्ट गरगर फिरतात आणि निखळतात. केवळ timepass म्हणून स्टेटमेंट काढतात, खात्यात पैसे नसले तरी पुनः पुनः काढण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्यामुळे मशीनवर ताण येतो आणि ते बंद पडते. हे सगळे रेकॉर्ड होते. हे ग्राहकांच्या लक्षात येत नाही.
आणखी एक महत्वाची गोष्ट ATM कार्ड सुरक्षित ठेवत नाहीत. कार्ड देताना काय काळजी घ्यायची ते आम्ही नेहमीच सांगायचो, तरी सुद्धा कार्ड आणि पिन नंबर बरोबर ठेवतात. कार्ड देऊन दुसऱ्याला पैसे काढून आणायला सांगतात. बॅलन्स कमी दिसला की बँकेत येउन तुम्हीच काहीतरी गडबड केली असे म्हणतात. मुलाने आईच्या खात्यातून, नवऱ्याने बायकोच्या खात्यातून, न सांगता मोठी रक्कम काढल्याचे बघून शॉक बसलेले ग्राहक मी पाहिलेले आहेत.
दुसरी एक तक्रार असते कार्ड लिमिट विषयी.
ग्राहकांच्याच सुरक्षिततेसाठीच ती लिमिट असते, कार्ड हरवले तर नुकसान त्या लिमिट पर्यंतच होते आणि पुढील 24 तासात पुढील कारवाई करता येते. ATM मधून येणारे पैसे थांबतच नाहीत म्हणून दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांसाठी माझ्या सहकारी अधिकाऱ्याला मध्यरात्री जावे लागले होते.
ATM चे दार आतून उघडायला बटण असते, ते न समजल्या मुळे दार फोडून बाहेर पडण्याची घटना पण घडली आहे.
दोन्ही बाजूनी थोडी थोडी सुधारणा झाली तर बरेच प्रॉब्लेमस आपोआप कमी होतील.
#smitanubhav 20
Comments
Post a Comment