स्मितानुभव #19 खवय्येगिरी
दादा (माझे वडील) तसे खवय्ये, तसे तिखट गोड सगळेच पदार्थ ते मनापासून खातात. पण दुधाचे गोड पदार्थ विशेष आवडीचे! माझी आई अतिशय सुगरण, सगळे पदार्थ चविष्ट आणि निगुतीने करणारी.
मुगाच्या डाळीची खिचडी हा आमचा कडचा रात्रीचा आवडता मेन्यू. खिचडी,तूप,लिंबाचा रस पापड,लोणचे आणि दही. ...आ हा हा
एकेदिवशी हाच मेनू होता, सगळ्यांच जेवण झाले होते. दादांचे संपत आले होते. त्यांनी खिचडीवर दही घेतले आणि आईला साय घाल म्हणाले.
ते खायच्या नादात पापड बाजूला तसाच राहिला. मग तो संपवण्यासाठी पुन्हा खिचडी, पुन्हा दही साय पुन्हा खिचडी असा सिलसिला खिचडी संपे पर्यंत चालू होता.
दादांना कधीही विचारले पक्वान्न काय करूयात?तर श्रीखंड किंवा बासुंदी उत्तर ठरलेले. आईने दीड किलो चक्का आणा म्हणून सांगितले की दोन किलो आणणार.....उगीच कमी नको पडायला!
एकदा त्या दोघांची पैज लागली की कोण कंटाळते ते बघु या. श्रीखंड करून आई.... की खाऊन दादा.
दोघेही कंटाळले नाहीत, एकमेकांना पुरून उरले. शेवटी दादांच्या ऑफिस मधील सहकारी कंटाळले आणि म्हटले सर आता बास करा श्रीखंड आणणे आणि खाणे. जवळजवळ तीन चार महिन्यांनी थांबला हा एपिसोड.
भेळ प्रोग्रॅम दोन तीन महिन्यातून एकदा व्हायचाच. गच्चीवर मिनी ठेलाच उभा करायची आई. त्या भेळेची चव अजून जिभेवर आहे.
त्याच प्रमाणे पॉट आईस्क्रीम. पॉट भाडयाने आणायचा, दोन चार दिवस आधीपासूनच बर्फाच्या गाडीवाल्याला सांगून ठेवायचे आणि नंतर रोज आठवण करायची. खडे मीठ शोधून ठेवायचे आणि मग करताना दर पाच मिनिटांनी उघडून बघायचे आईस्क्रीम झाले की नाही. फारच मज्जा यायची.
आणखी एकदा सगळे सामान देऊन बाहेरून आईस्क्रीम करून आणायचे आणि जीभ जड होईपर्यंत खायचे......
काय ते दिवस होते ओल्या फडक्यात बांधून ,गार करायला माठा खाली ठेवलेले कलिंगड सगळ्यांनी एकत्र बसून खायचे.
खरं अश्या खूप आठवणी आहेत, त्यामुळे तोंडाला फार पाणी सुटले म्हणून म्हटले आता पुरे
प्रत्येक गोष्ट मनापासून करायची आणि आनंद
घ्यायचा आणि लुटायचा .....
#smitanubhav 19
Comments
Post a Comment