स्मितानुभव#17 मला भावलेले लंडन 4


मुक्काम संपत आला होता, काहीतरी वेगळे पाहू या असा विचार सुरू होता. छोटी कुहू बरोबर असल्यामुळे प्रवासावर जरा मर्यादा होती. तिला पण मजा येईल असे काहीतरी आम्ही शोधत होतो. मध्यंतरीच्या काळात तिची PEPPA PIG  ह्या कार्टून मालिकेशी ओळख झाली. पिग हा शब्द आपल्याला कसातरी वाटतो, पण खरंच खूप सुंदर आहे ती सिरीयल. शोध घेत असता " Paultons Park.....Peppa Pig World " सापडले. प्रवास पण फार नव्हता. ऑनलाइन बुकिंग केले आणि  निघालो.

विस्तिर्ण जागेवर हे थीम पार्क बांधण्यात आले आहे. परदेशी ज्या तऱ्हेने सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या तिथे होत्याच. एक वेगळी वाटली ती म्हणजे तिकीट मुलांच्या उंचीप्रमाणे होते. प्रवेशव्दाराजवळ तीन फुटावर एक बार बसविलेला होता, त्याखालून जाऊ शकेल त्याला अर्ध तिकीट....बास कटकटच नाही काही.

आत सगळीकडे व्यवस्थित मार्गदर्शक बोर्ड होते, अगदी सहजच आम्ही पेप्पा पिग वर्ल्ड ला पोहचलो. जे tv वर चित्रस्वरूपात पाहत होतो, ते तिथे प्रत्यक्ष उभे केले होते..... अगदी सेम टू सेम
पेप्पाचे घर, शाळा, मैत्रिणीचे घर, आजोबांचे घर अगदी लहान सहान गोष्टी पण साकारलेल्या होत्या. त्यात दाखविण्यात येणाऱ्या सगळ्या rides तिथे होत्या. विशेष म्हणजे सगळ्या राईड्स मध्ये मोठी माणसे सुध्दा बसू शकतात. खूपच सुंदर अनुभव होता. कुहू तर इतकी खूष झाली होती की बस रे बस. दोन वाजता पेप्पा आणि तिचा लहान भाऊ जॉर्ज तिथे आले. खरी पेप्पा आणि जॉर्ज पाहून कुहूची बोलतीच बंद झाली. मग तिला आम्ही समजावून सांगितले की ती खरी माणसेच आहेत त्यांनी फक्त तसा ड्रेस घातला आहे, मग जाऊन पठ्ठीने शेकहँड केला. तिथून बाहेर यायचेच नव्हते, पुन्हा येऊ या ह्या कबुलीवर बाहेर निघालो.

तिथून आम्ही " हेलींग आयलँड "ला गेलो.इथे आम्ही "CARAVAN "  मध्ये राहिलो , वेगळे काहीतरी म्हणून. रमणीय परिसरात 100 ते 150 वेगवेगळ्या साईजची कॉम्पॅक्ट घरे होती. आत सर्व सुख सोयी होत्या. दोन बेडरूम, हॉल, किचन आणि वॉशरूम सुद्धा. रेडी टू कुक बरेच खायचे पदार्थ घेऊन गेलो होतो. दूध ब्रेड आणि गरजेच्या वस्तू साठी तिथेच एक दुकान होते. बाकी घसरगुंडी,झोपाळा, सीसॉ ,swimming पूल वगैरे होतेच.

इथला समुद्रकिनारा दगड गोट्यांचा आहे.त्यामुळे जास्त मजा आली नाही. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने एक विनटेज ट्रेन आहे. ती ट्रेन सिनियर सिटीझन स्वयं स्फूर्तीने चालवितात. एक गोड आजी तिकीट देत होत्या. जेमतेम 8 किलोमीटर असेल ट्रेन प्रवास, पण मध्ये दोन स्टेशन्स, इंजिनची दिशा बदल सगळे जवळून बघता आले.
एकूण बालपण पुन्हा अनुभवले, काराव्हॅन
मध्ये भातुकली आणि समुद्रकिनारी पेशवे पार्क मधील "फुलराणी".....
#smitanubhav 17

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस