स्मितानुभव #16 मला भावलेले लंडन 3
असच एकदा निवांत बसलेली असताना लंडन मध्ये आलोच आहोत तर ग्रीनविच कुठे आहे ते बघावे,असा विचार डोक्यात आला. खरं तर भूगोल काही माझा आवडीचा विषय नाही, पण काही गोष्टी पक्क्या लक्षात रहातात तसे
ग्रीनविच लक्षात राहिले.
लगेच ट्युब मॅप बघितला, स्नेहा तिच्या मित्रमैत्रिणींशी बोलली आणि अक्षरशः सात आठ जण तयार झाले. मला बरे वाटले की पुढच्या पिढीतही जाणून घेण्याची वृत्ती आहे.
काल सांगितल्या प्रमाणे DLR लाईनच्या ट्युब ने निघालो. फारच सुंदर प्रवास आहे हा. ह्या line वरची सगळी स्टेशन्स खूपच सुरेख आहेत.
ग्रीनविच हे छोटे गाव आहे. एका मोठ्या पार्कमध्ये थोड्या उंच टेकडीवर "Royal Observatory " आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता मोठ्या बागेतून आहे. भरपूर झाडे,पक्षी ,खारुताई,आणि प्रवाशांबरोबर आलेली विविध जातीची कुत्री ,त्यांच्या मागे धावणारी लहान मुले ....फारच रमणीय दृश्य होते. वरून मागे आणि खाली पाहिले तर निसर्ग आणि आधुनिकता ह्याचा सुरेख संगम दिसत होता.
तिकीट अर्थातच आहे, इकडे तसे काहीच फुकट नसते. तिकीट काढून होईपर्यंत मी आजूबाजूचे निरीक्षण करत होते.
खरं सांगायचे तर ती एक रुंद रेषा आहे..." स्टील पट्टीने दाखविलेली "...... साधी रेघ ....पण पृथ्वी चे दोन भाग करणारी, विश्वाचे घड्याळ इथून सुरू होते,
'PRIME MERIDIAN'
एकाच वेळी पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्धात असण्याची भावना खूप ग्रेट होती. भारताचे प्रतिनिधित्व करणारे "BOMBAY" बघून खूप भारी वाटले.
रॉयल ऑब्झरवेटरी चांगलीच असणार आम्ही नीट बघू शकलो नाही, शाळेची ट्रिप आल्याने खूप गर्दी होती आणि आमच्याकडे वेळेची कमतरता होती.
कसा शोध लावला आणि त्याचा इतिहास आता विकिपीडियावर सहज उपलब्ध आहे, परंतु ह्या काहीही सोयी नसताना अभ्यास करून ही रेषा निश्चित करणे खूप ग्रेट वाटले.
लंडनची हवा एकदम लहरी आहे. तीन तासात तीन ही ऋतूंचा अनुभव येऊ शकतो. हवामानाचा अंदाज बघूनच आपले कार्यक्रम आखावे लागतात. ते बघून हाइड पार्कला जाण्याचे ठरविले. दुपारी एक तास पाऊस असणार होता बाकी पूर्ण दिवस हवा चांगली असणार होती. माझा मुक्काम ही संपत आला होता म्हणून जायचे ठरविले.
पूर्ण पार्क बघूच शकत नाही इतके मोठे आहे. बघितलेला भाग खूप छान आहे. मध्ये एक मोठे तळे आहे, त्यात खूप बदक होती ती काठावर येऊन आपल्या हातातून ब्रेड खात होती. कुहूने एक पूर्ण ब्रेड भरविला . तिचा तो निरागस आनंद पाहून एका इंग्रजी माणसाने त्याचा पण तिलाच दिला. बदकांचे खेळ हालचाली पाहून ती खूप खूष झाली. बघता बघता पावसाची वेळ झाली. एका जागी बसून छत्री उघडून पावसाची मजा लुटायचे ठरविले. भरपूर फुले असलेली जागा निवडून बसलो आणि बघता बघता तास निघून गेला आणि लख्ख ऊन पडले.
आणखीन जरा पुढे मुलांना पाण्यात खेळण्याची सोय केलेली आहे. तिथे थोडावेळ खेळून परत निघालो, संधी मिळाली तर परत यायचे असे मनात ठरवून.....
#smitanubhav 16
Comments
Post a Comment