स्मितानुभव#14 मला भावलेले लंडन 1
परदेशी राहण्याची विशेष आवड नसताना सुद्धा 6 महिने लंडन ला राहायला मिळाले. तिथल्या भावलेल्या गोष्टी
निसर्गाने जे दिले आहे, ते जास्तीत जास्त जपलेले आहे. घरे बांधण्यासाठी, पिकनिक स्पॉट बनविण्यासाठी त्यात काहीही बदल केलेला नाही.
तिकडे स्वतःच सगळी कामे करावी लागतात त्यामूळे चाकाचा वापर खूप आहे. खरेदी केलेले समान नेण्यासाठी ट्रॉली बॅग वापरतात. दुकानात सुद्धा मोठ्या मोठ्या ट्रॉली असतात.
वाहतूक व्यवस्था अतिशय सुरेख आहे. बस वाहकाशिवाय असतात. एकच कार्ड बस आणि ट्रेनला चालते. बस मध्ये चढताना swipe करायचे तसेच रेलवे स्टेशन मध्ये जाताना आणि बाहेर येताना करायचे. शिवाय हे कार्ड छोट्या दुकानात सुद्धा मिळते. तिकिटासाठी रांग नसल्याने विना तिकीट ही भानगडच नाही. बस चालक अतिशय कौशल्याने आणि सौजन्याने वागतात. अचानक ब्रेक लावावा लागला तर लगेच सॉरी म्हणतात.
" रांगेचा फायदा सर्वांना" हे इथले ब्रीद वाक्य आहे.
अगदी छोट्या कॉफी शॉप पासून सगळीकडे रांग असते."Excuse me ! Are you in the queue?", हे अगदी सर्रास कानावर पडणारे वाक्य आहे. मोठया शॉपिंग मॉल मध्ये बिल करण्यासाठी ग्राहकांची एक रांग असते, समोर भरपूर बिलिंग काउंटर असतात, जो कॅशियर फ्री होईल तो "नेक्स्ट" म्हणतो, एक एक करून रांग पुढे सरकते. चटकन आपला नंबर कधी येतो ते कळत सुद्धा नाही. पण बस स्टॉप वर रांग कधीच दिसली नाही, दोन कारणे असावीत. एक म्हणजे बसची संख्या भरपूर आहे. पुढची बस कधी आहे हे दाखविणारे बोर्ड बहुतेक बस स्टॉप वर आहेत आणि दुसरे बस नक्की स्टॉपवर थांबतेच, सगळ्यांना घेऊनच पुढे जाते.
बस स्टॉप अगदी सोईचे आहेत. सर्व मोठया मोठया डिपार्टमेंटल स्टोअर जवळ बस स्टॉप आहेत. स्वतःची गाडी नसली तरी अगदी सहजतेने आपण फिरू शकतो.
आणखी एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे.....मॉल बंद होण्याची वेळ. आज मॉल किती वाजता बंद होणार ते बोर्ड वर लिहिलेले असते. नक्की आठवत नाही पण बहुदा आठवड्याचे वेळापत्रक लावलेले असते. दहा मिनिटे असताना एक एक दार बंद करायला लागतात. स्पष्टपणे विचारतात "Are you sure that you will complete your shopping within time?".
तांत्रिक दृष्ट्या पाश्चिमात्य देश पुढारलेलेच आहेत. तंत्रज्ञानचा वापर थक्क करतो. भरपूर बिलिंग काऊंटर असले तरीसुद्धा सेल्फ बिलिंग काउंटर खूप आहेत. आपण स्वतःचे बिल स्वतः करून , देऊन निघू शकतो. बहुतेक जण कार्डचा वापर करतात. असे करत असताना काही अडचण आली, कोड स्कॅन झाला नाही, तर लगेच मदतीला येतात.
सामान्य माणसाची सोय हा लंडनचा मूलमंत्र आहे.
#smitanubhav 14
Comments
Post a Comment