स्मितानुभव#13 TV आणि मुले
हर्षद स्नेहा.....वय अंदाजे 4 वर्षे
1990 फक्त दूरदर्शनचा जमाना होता. रविवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा लागायचा. बहुदा चैत्र महिना असावा किंवा गुढीपाडवा असावा. रामायण सिनेमा हिंदीतून सुरू होता. माझ्यातील संस्कारी आई एकदम जागी झाली. श्रीराम आणि लव कुश यांच्यातील युद्धाचा प्रसंग चालू होता. ते बघायला मुलांना मजा येत होती, बाकी सवांद त्यांना कळत नव्हते. मी मुलांना म्हटले की अरे हे युद्ध बाबा आणि मुलात चालू आहे. बाबांना माहीत नाही की ती आपलीच मुले आहेत आणि मुलांना माहीत नाही की हे आपले बाबा आहेत म्हणून.
" ए आई काहीतरी सांगू नकोस, असे कधी होईल का? बाबांना मुलं माहीत नाहीत! हं काहीतरीच तुझं!" आई निरुत्तर.
हर्षद स्नेहा ...... वय अंदाजे 7 वर्ष
वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषण लिहायचे होते. विषय होता " स्त्री संत ". मी ' संत मीराबाई ' हा विषय निवडला. दोघेही इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने मराठी अजून लिहिता वाचता येत नव्हते. त्यामुळे मी ते लिहून टेप रेकॉर्डर वर रेकॉर्ड करून ठेवत असे. शाळेतून आल्यावर ते ऐकून एकून ते मुले पाठ करून ठेवत असत, मग मी घरी आल्यावर बाकीच्या गोष्टी सांगत असे.
मी घरी आल्यावर,
मुले : " म्हणजे मिराबाईंना आई वडील होते तर! " माझा चेहरा प्रश्नांकित!
"अरे सगळ्यांनाच आई वडील असतात. त्या तर राजकन्या होत्या." माझे उत्तर.
"ते तू पूर्वीचे काही सांगू नकोस. पूर्वी कशी पण बाळ व्हायची! पानांवर,घरट्यात,कमळात !"इति मुले.
T V वर पौराणिक मालिका सुरू होती, नाव आठवत नाही आता, त्यात नुकताच कार्तिकेयचा जन्म दाखविला होता. आई निरुत्तर.
हर्षद स्नेहा......वय अंदाजे 11 वर्षे
एके दिवशी संध्याकाळी
स्नेहा : " आई रेप म्हणजे काय?" मी स्तब्ध आणि अचंबित. एकदमच अनपेक्षित प्रश्न.
हर्षद : "आईला माहीत नसणार! ती कुठे ' शांती ' बघते." (सकाळी लागणारी T V सिरीयल )
मुलांचे उत्तर ! आई निरुत्तर......माझा निश्वास सुटकेचा.
Comments
Post a Comment