स्मितानुभव#12 वाचन



वाचनाची गोडी मला कधी लागली ते मला आठवत नाही, थोडक्यात ती खूप लहानपणी लागली. आईने वाचून दाखविलेले रामायण आणि महाभारत अजून स्मरणात आहे. दरवर्षी मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की आई नवीन पुस्तके आणायची. मोठया अक्षरातील बरीच पुस्तके अजून सुद्धा माझ्या माहेरी आहेत. दरवर्षी ह्या खजिन्यात भर पडतच होती.
साधारण चौथी पाचवीत असताना दादा (माझे वडील ) त्यांच्या ऑफिसच्या ग्रंथालयातून जरा मोठी पुस्तके आणू लागले. चांदोबा आणि किशोर तर दर महिन्याला घरी यायचे. आवर्जून पुस्तक प्रदर्शनाला घेऊन जायचे.
हळूहळू साप्ताहिकातील बाल विभाग वाचायला सुरुवात झाली. त्याच बरोबर आई दादा सांगायचे नुसते वाचू नका, काय चांगले आहे, काय आवडत आहे ते अंगी बाणण्याचा प्रयत्न करा. वाचनाची आवड निर्माण होऊन कधी वृद्धिंगत झाली ते कळलेच नाही. श्यामची आई, गोट्या, चिंगी अशी अनेक पुस्तके अजून स्मरणात आहेत.
माझी आजी त्या काळात सदाशिव पेठेतील ललित ग्रंथालयची सभासद होती. ती स्वतः जाऊन मासिक बदलून आणायची. हळूहळू ते काम माझ्याकडे आले आणि ग्रंथालय ह्या कन्सेप्टशी माझी ओळख झाली.
दहावीच्या सुट्टीत शेजारच्या बंगल्यात नवीन सुरू झालेल्या लायब्ररीत मी स्वतः सभासद झाले. रोज एक ह्या गतीने पुस्तक वाचत असे. माझे वडील "ब्रिटिश कौन्सिल "चे सभासद होते, आधी ते माझ्यासाठी छोटी छोटी इंग्रजी पुस्तके आणायचे, पण त्याची विशेष गोडी लागली नाही. नंतर मला काय हवे ते घेऊन ये म्हणून तिकडे पाठवायचे, तरी नाही झाली इंग्रजी पुस्तकांशी गट्टी.
वाचायची इतकी सवय लागली होती की कुठलाही बोर्ड, पत्रक, वर्तमानपत्र मी सोडायची नाही. त्यातूनच श्री.प्रवीण दवणे, सौ शैलजा शेवडे ह्याची ओळख झाली.
पुण्यातील अप्पा बळवंत चौकात "रसिक साहित्य" नावाचे भले मोठे दुकान आहे. त्यांनी एक नवीन स्कीम सुरू केली होती. दुकानातील नवीन पुस्तके आपण स्वतः बघून,निवडून वाचायला न्यायची. ही संधी मी उचलली. पहिल्या दिवशी मी जवळ जवळ वेडीच झाले होते, कुठले पुस्तक आधी घ्यावे तेच ठरत नव्हते. सर्व प्रकारची पुस्तके वाचली. कळत नकळत माझ्या जीवनशैली वर त्याचा परिणाम झाला. काय करू नव्हे ते पक्के डोक्यात बसले. हा सिलसिला लग्न होई पर्यंत चालू होता आणि ते सभासदत्व भावंडांकडे पास ऑन झाले. मी जुलै महिन्यात लोणावळा शाखेत नव्याने रुजू झाले. तेव्हा इंजिन लोकल होती, दोन तास लागायचे पोहचायला. बाहेर पाऊस,हिरवागार निसर्ग, गाडीची झुक झुक आणि हातात पुस्तक..... ह्यापेक्षा सुंदर काही असेल असे वाटत नाही.

हळूहळू इतर जबाबदाऱ्या वाढत गेल्या,वेळ कमी पडू लागला. तरीही मिळेल ते वाचायची सवय अजूनही आहे. जमेल तशी पुस्तके विकत पण घेतली......ह्या सगळ्यात दिवाळी अंकाचा उल्लेख हवाच

#smitanubhav 12

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस