स्मितानुभव#11 चिखली
देहू आळंदी रोड वर " चिखली "नावाचे एक खेडेगाव आहे. आता ते खूपच सुधारले आहे, पण सुमारे 25 वर्षांपूर्वी ते टिपिकल खेडेगाव होते. आमची शाखा 10 वाजता सुरू व्हायची.
रस्ते स्वच्छ असायचे, प्रत्येक घरापुढे सडा रांगोळी झालेली असायची. वातावरणात प्रसन्नता असायची जणू आमच्या स्वागताची तयारीच.
ह्या गावची एक खासियत होती. बऱ्याच जणांची दोन दोन लग्न झालेली होती. अगदी आमची पार्ट टाइम स्वीपर होती, तिच्या मुलाच्या पण दोन बायका होत्या, आमदनी काहीही नसताना. दोन लग्न हे प्रकरण इतके मोठे होते की आम्ही चेष्टेने म्हणायचो : " उद्या स्टाफपैकी कोणी सांगितले तरी आश्चर्य नाही वाटणार "
ह्या शाखेत काही प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे जुन्या सगळ्या कर्मचाऱ्यांची बदली झाली होती आणि आम्ही सगळे नवीन आलो होतो. बँकिंग चा आत्मा म्हणजे "विश्वास " , तोच गमावलेला होता. आम्हाला तो परत मिळवायचा होता. सुदैवाने आमची टीम खूप मस्त जमली होती.
शाखा खेड्यातील असल्यामुळे तोबा तोबा गर्दी फक्त पगाराच्या दिवशी असायची, बाकी दिवस बेताने असायची. उन्हाळ्यात बँकेत 'पंखा असतो' म्हणून उगाचच येऊन बसणारे पण ग्राहक होते. आमच्या वागणुकीने सर्वांशी आपुलकीचे नाते जोडले गेले होते. बहुतेकांना आम्ही ओळखत असायचो.
एक दिवस एक शिक्षिका आली आणि पैसे भरायचे चलन घेऊन लिहायला बसली. बराच वेळ झाला तरी अजून का भरत नाही म्हणून आम्ही उठून बघितले, (पूर्वी काऊंटर उंच असायचे,त्यामानाने स्टाफच्या सीट खाली असायच्या) आणि विचारले की काय झाले? भरते भरते म्हणून काऊंटर जवळ गेली. तिने लिहिलेली रक्कम आणि ती देत असलेली कॅश ह्यात फरक होता, तसे कॅशियर ने सांगताच तिला एकदम शॉक बसला. पाच मिनिटांनी ती भानावर आली आणि म्हणाली की इथला माणूस कुठे आहे? तो मला नोटा नीट करून देत होता. कुणी भामटयाने तिला फसविले होते. पैसे मोजून देतो सांगून बरीच रक्कम त्याने लंपास केली होती. ती शिक्षिका धाय मोकलून रडू लागली. फंडाचे कर्ज काढून घर बांधणीसाठी ती ते पैसे घेऊन आली होती. असहाय बघण्यापलीकडे आम्ही काहीही करू शकलो नाही. बऱ्याचदा पेपर मध्ये अशा घटना आपण वाचतो, पण प्रत्यक्ष अनुभव आला की मुळापासून हादरायला होते.
ह्याच शाखेतील आणखी एक घटना
एका ग्राहकाने मायनर मुलीच्या नावे बरेच पैसे जमविले होते. मुलगी एकुलती एक होती. हुशार होती. मेडिकलला होती. वडील नेहमी अभिमानाने तिच्याबद्दल सांगायचे. एके दिवशी ते सांगत आले की सगळ्या FD च्या पावत्या घेऊन ती पळून गेली आहे. एव्हाना मुलगी सज्ञान झाली होती. आयुष्यभर कष्ट करून बापाने जमविलेला पैसा घेऊन पळून गेली होती. तो गरीब बिचारा बाप रोज येऊन बँकेत बसायचा 'आज तरी मुलगी येईल 'ह्या आशेने. माझी बदली होई पर्यंत तरी ती आली नव्हती. तो बिचारा केविलवाणा बाबा अजून डोळ्यासमोर आहे.....
#smitanubhav 11
Comments
Post a Comment