स्मितानुभव#10 कन्यादान
#स्मितानुभव 10
आज 6 मे
बरोबर 7 वर्षपूर्वी ह्याच दिवशी माझ्या लाडक्या लेकीचे "स्नेहाचे" लग्न झाले.
लेक आता आपल्याला सोडून जाणार ह्या भावनेपेक्षा कर्तव्यपूर्तीची भावना मोठी होती.
सव्वातीन पौंडचा जन्मलेला जीव, विविध संकटांवर मात करत, अडीअडचणी ना तोंड देत आज स्वतःच्या पायावर यशस्वीपणे उभा होता. आईवडिलांचे संस्कार बरोबर घेऊन नवीन प्रवासाच्या वाटेवर पाहिले पाऊल टाकणार होता.
नववधूच्या वेषात तिला पहाताना विरहापेक्षा कृतार्थताच जास्त वाटत होती.
आज काल "कन्यादान"ह्या शब्दावर आक्षेप घेतला जात आहे.
कन्या काय वस्तू आहे का तिचे दान करायला? असा विचार रूढ होत आहे. ती वस्तू नाहीच आहे, शरीराबाहेर वाढलेले काळीज आहे. आजवर आपण त्याला जपलेले आहे आणि ते तसेच जपले जावे म्हणून जबाबदार हातात सोपविणे म्हणजे कन्यादान.
ईश्वरकृपा, पूर्वपुण्याई आणि थोरांच्या आशीर्वादाने तिला गौतम सारखा गुणी जोडीदार लाभला. सासुसासरे प्रेमळ आणि काळजी घेणारे मिळाले. लग्न समारंभ उत्तमच झाला. सगळे नातेवाईक,आमचा,तिचा,आणि हर्षदचा मित्र परिवार आवर्जून लग्नाला आले होते. ही आमची श्रीमंती कार्यलयभर शोभून दिसतं होती.
सगळ्यांची जेवणं झाली, विहिणीची पंगत झाली. पाहुणे आशीर्वाद देऊन घराकडे परत निघाले. मन एका वेगळ्याच भावनेने तृप्त होते.
हळूहळू स्नेहाच्या पाठवणीची वेळ जवळ आली. सगळे गंभीर झाले. नकळत डोळ्यातुन अश्रू ओघळू लागले. तेव्हढ्यात गौतम म्हणाला "मुलगा मिळाल्यावर तुमच्याकडे रडतात का ? स्नेहा निघाली नाही आहे मी तुमच्याकडे आलो आहे."
सहजच वातावरण हलके झाले आणि हसतच सगळे मार्गस्थ झाले.
आज ती तिच्या संसारात रमली आहे. स्नेहा आली आणि आमचे घर बोलू लागले, खळखळून हसू लागले असा अभिप्राय तिच्या सासु सासर्यांनी दिला आहे. कुहूच्या आगमनाने घरातला गोडवा वाढला आहे.....आणखी काय पाहिजे !
एक मात्र खरं लेकीच्या लग्नानंतर माहेरचे आंगण सुने होते आणि तिच्या किलबिलाटाची आतुरतेने वाट पहात असते....
Comments
Post a Comment