स्मितानुभव #1 - सल्ला
मी खारघर मुंबई शाखेत असतानाची गोष्ट.
एक नवविवाहीत मुलगी घाबरत घाबरत बँकेत आली. गोंधळून इकडे तिकडे बघत होती.मी विचारले काय झाले? काही हवे आहे का? खाते काढायचे आहे का?ती म्हणाली खाते आहे, मला हा चेक जमा करायचा आहे. मला कळेना कि त्यात एव्हढे काय विशेष आहे! ती पुढे म्हणाली "हे पैसे मी लग्नाच्या आधी साठविलेले आहेत आणि ते मला माझ्या नवऱ्याला सांगायचे नाही" मला नेहमीच मुलींची काळजी वाटते. मी सहजच विचारले काही प्रॉब्लेम आहे का? काही टेन्शन आहे का?तसे ही बँकेच्या नियमानुसार आम्ही कोणालाच काही सांगत नाही. ती म्हणाली "तसे काहीच नाही, यजमान चांगले आहेत, मलाच काळजी वाटते" मी म्हटले कि तुला एक मोठी म्हणून सल्ला देऊ का? ती लगेच हो म्हणाली.
मी म्हटले लग्नानंतरचा हा पहिलाच प्रसंग आहे.तू यजमानांना विश्वासात घेऊन सांग,हा चेक त्यांना दाखव आणि मग बँकेत भर. फारतर काय होईल ह्यावेळी ते तुझ्याकडे पैसे मागतील आणि तुला हि कळेल नक्की त्यांच्या मनात काय आहे ते. तिला सल्ला पटला.
दुसऱ्या दिवशी ती हसत हसतच बँकेत आली. मी विचारले काय झाले.तर म्हणाली मिस्टरनी अजून पैसे दिले आणि म्हटले कि राऊंड अमाउंटची पावती कर.माझ्या छोट्याशा सल्ल्याने त्या दोघांनी एकमेकांचा विश्वास संपादन केला.जोडी एकदम खूष आणि आनंदी आहे.
या पेक्षा आणखी काय पाहिजे!
माझी ही पोस्ट वाचून माझे वडील प्रभाकर बेहेरे (वय 82)यांनी त्यांचा एक अनुभव मला लिहून पाठवला आहे,तो मी कॉपी पेस्ट करत आहे.
"लेख चांगला जमला आहे. या वरून माझी एक आठवण इथे देतो .आँफीसमधे एक बाबाजी ऊत्तेकर नावाचा एक प्यून होता. सहज बोलताना त्याला विचारले की तो काही सेविंग करतो की नाही? तो म्हणाला नाही. मग मी त्याला बचतीचे महत्त्व पटवून दिले .त्याला रिकरींग खाते (5 वर्ष) उघडून दिले. दरमहा पगारातून पैसे जाऊ लागले. पाच वर्षांनी त्याला जेव्हा एक मोठी रक्कम मिळाली तेंव्हा तो खूप खूष झाला. त्याला ते पैसे मुलीच्या लग्नाच्या वेळी उपयोगी पडले."
आम्ही चालवू हा पुढे वारसा....
Comments
Post a Comment